नवी दिल्ली : आशियाई सुवर्णपदक विजेती राही सरनोबत, जागतिक रौप्यपदक विजेती अंजूम मुद्गिल आणि युवा ऑलिम्पिक विजेता सौरभ चौधरी यांनी शुक्रवारी राष्ट्रीय निवड चाचणी नेमबाजी स्पर्धेत आपापल्या गटांमध्ये विजेतेपद पटकावले आहे.
डॉ. कर्णी सिंग नेमबाजी केंद्रावर चालू असलेल्या या स्पर्धेत महिलांच्या २५ मीटर प्रकारातील सातव्या निवड चाचणीत राहीने विजेतेपद पटकावले. महिलांच्या ५० मीटर रायफल प्रोन प्रकारात अंजूम अव्वल ठरली. पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारातील सहाव्या निवड चाचणीत सौरभला जेतेपद मिळाले.
राहीने दिमाखदार कामगिरीचे प्रदर्शन करताना पात्रता फेरीत सर्वाधिक ५८६ गुण मिळवले, तर अंतिम फेरीत ३९ गुण मिळवले. एअर इंडियाच्या अन्नू राज सिंगने ३५ गुणांसह दुसरे स्थान मिळवले.
उत्तर प्रदेशच्या सौरभने शानदार कामगिरी करत पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकाराच्या सहाव्या निवड चाचणीच्या अंतिम फेरीत २४५.४ गुण मिळवले. स्वत:च्याच विश्वविक्रमाने त्याला ०.९ गुणांनी हुलकावणी दिली. श्रवण कुमारला (२४३.९ गुण) रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात अंजूमने सलग दुसऱ्या दिवशी विजेतेपद पटकावले.