Raj Thackeray Congratulates Divya Deshmukh Won FIDE : भारताची युवा बुद्धिबळपटू दिव्या देशमुख हिने मोठी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. दिव्याने एफआयडीई विश्वचषक स्पर्धेच्या (बुद्धिबळ) अंतिम फेरीत भारताची ग्रँडमास्टर कोनेरू हम्पी हिचा पराभव करत विश्वविजेतेपदाला गवसणी घातली आहे. १९ वर्षीय दिव्या देशमुख हिने टायब्रेकरमध्ये गेलेल्या सामन्यात उत्कृष्ट चाली चालत कोनेरू हम्पीला पराभूत केलं.
जॉर्जियाच्या बटुमी येथे पार पडलेल्या एफआयडीई महिला विश्वचषक स्पर्धेत, भारताच्या या दोन्ही लेकी एकमेकींविरूद्ध खेळत होत्या. दोन भारतीय खेळाडू या स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झाल्याने विश्वविजेतेपद भारतातच येणार हे निश्चित होतं. दोघींपैकी कोण जिंकणार याचाच निकाल आज (२८ जुलै) अंतिम सामन्यात लागणार होता. या अंतिम सामन्यात दिव्या देशमुखने अनुभवी कोनेरू हम्पीला टायब्रेकमध्ये पराभूत करून शानदार विजय मिळवला.
या विजयामुळे दिव्या देशमुखने भारताची चौथी महिला ग्रँडमास्टर बनण्याच्या दिशेने एक पाऊल टाकलं आहे ही स्पर्धा तब्बल २४ दिवस चालली आणि अंतिम फेरीत दिव्याने अत्यंत संयम, कौशल्य आणि आत्मविश्वास दाखवून ऐतिहासिक कामगिरी केली.
राज ठाकरेंकडून खास शब्दांत दिव्याचं कौतुक
दिव्याच्या या कामगिरीनंतर तिच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील खास शब्दांत दिव्याचं कौतुक केलं आहे. राज यांनी दिव्याबाबत एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की “अवघ्या १९ वर्षाच्या मराठमोळ्या दिव्या देशमुखने बुद्धिबळाच्या (FIDE) विश्वचषक स्पर्धेत भारताच्याच कोनेरू हंपीला हरवून विश्वविजयपद मिळवलं. दोन भारतीय महिला बुद्धिबळाच्या पटावर विश्वविजयासाठी चाली रचत आहेत हे दृश्यच खूप सुंदर आहे आणि कुठल्याही परिस्थितीत भारताकडेच विश्वविजय पद आलं असतं हा देखील आनंदाचा भाग. पण दिव्याचं मनापासून अभिनंदन.”
मनसे अध्यक्ष म्हणाले, “या निमित्ताने अधिकाधिक महिला बुद्धिबळपटू तयार होऊ देत, त्यांना विजयाला गवसणी घालण्याची प्रेरणा मिळू दे हीच इच्छा. महाराष्ट्राकडे बुद्धी आणि बळ दोन्ही ओतप्रोत आहे, ते जेव्हा जेव्हा महाराष्ट्राचं नाव मोठं करायला वापरलं जातं तेव्हा खूप आनंद होतो. दिव्या तुझं पुन्हा एकदा अभिनंदन!”