क्रिकेटचे अर्थकारण पालटणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेच्या प्रशासकीय समितीचा प्रमुख कोण होणार, ही महिन्याभराची उत्कंठा सोमवारी संपुष्टात आली. राजीव शुक्ला यांच्याकडे पुन्हा प्रशासकीय समितीच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.
माजी केंद्रीयमंत्री आणि काँग्रेसचे नेते शुक्ला २०१३ पर्यंत आयपीएलच्या अध्यक्षपदावर कार्यरत होते. परंतु आयपीएल स्पॉट-फिक्सिंग प्रकरणाचे वादळ घोंगावल्यामुळे शुक्ला यांनी राजीनामा दिला होता. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) निवडणुकीनंतर आयपीएल प्रमुख पदाची धुराचा कोणाकडे सोपवली जाणार, याबाबतची चर्चा ऐरणीवर होती. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली, अजय शिर्के आणि रणजिब बिस्वाल यांची नावे या चर्चेत अग्रेसर होती. परंतु शुक्ला यांनी बाजी मारली. आयपीएलच्या आठव्या मोसमाला कोलकातामधील उद्घाटन सोहळ्यानिशी मंगळवारी प्रारंभ होणार आहे. त्याच्या एक दिवस अगोदर बीसीसीआयने आयपीएलचा अध्यक्ष घोषित करून क्रिकेटजगताला सुखद धक्का दिला आहे.
आयपीएल प्रशासकीय समितीमध्ये गांगुलीचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. भारतीय क्रिकेट संघाचे संचालक रवी शास्त्री यांनाही प्रशासकीय समितीवर कायम ठेवण्यात आले आहे. संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखालील वरिष्ठ राष्ट्रीय निवड समिती येत्या हंगामासाठी कायम ठेवण्यात आली आहे.
भारताचे माजी कर्णधार अनिल कुंबळे यांच्याकडेच तांत्रिक समितीचे अध्यक्षपद कायम ठेवण्यात आले आहे. तथापि, वित्त समितीच्या अध्यक्षपदावर काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
गोव्याचे चेतन देसाई विपणन समितीचे प्रमुख असतील, तर आंध्र प्रदेशचे गोकाराजू गंगाराजू दौरे आणि कार्यक्रम आखणी समितीचे अध्यक्ष असतील. बंगाल क्रिकेट असोसिएशनचे कोषाध्यक्ष बिस्वरूप डे प्रसारमाध्यम समितीचे नवे अध्यक्ष असतील.
अनुराग ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली मान्यता समिती नव्याने स्थापन करण्यात आली आहे. याचप्रमाणे बीसीसीआयचे अध्यक्ष जगमोहन दालमिया यांच्याकडे घटना आढावा समितीचे अध्यक्षपद देण्यात आले आहे, शुक्ला यांचा या समितीवर समावेश करण्यात आला आहे. सद्यस्थितीत भ्रष्टाचार विरोधी आणि सुरक्षा विभाग ही उपसमिती घोषित करण्यात आलेली नाही.

मुंबईच्या क्रिकेट प्रशासकांना मोठय़ा संख्येने स्थान
भारतीय क्रिकेटच्या राजकारणामध्ये नवे समीकरण जुळत असताना त्याची प्रचीती विविध समित्यांच्या नेमणुकांमध्येही दिसून आली. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) अनेक प्रशासकांना बीसीसीआयच्या समित्यांमध्ये मोठय़ा संख्येने सामावून घेण्यात आले आहे. एमसीएचा वरिष्ठ स्पर्धा समितीवर समावेश करण्यात आला आहे. संयुक्त सचिव नितीन दलाल यांचा पंचांच्या उपसमितीवर, तर डॉ. पी. व्ही. शेट्टी यांचा आयपीएल प्रशासकीय समितीवर समावेश करण्यात आला आहे. एमसीएचे उपाध्यक्ष रवी सावंत यांना विपणन समितीमध्ये स्थान देण्यात आले आहे. याशिवाय संग्रहालय समितीचे अध्यक्षपद सोपवण्यात आले आहे. तर अरविंद कदम या समितीवर सदस्य असतील. कोषाध्यक्ष विनोद देशपांडे यांचा प्रसारमाध्यमांच्या समितीवर समावेश करण्यात आला आहे. तथापि, वृंदा भगत यांनी महिला क्रिकेट समितीवर स्थान मिळवले आहे.

आयपीएल प्रशासकीय समितीच्या प्रमुखपदाची जबाबदारी सोपवण्यात येणे, हा मी माझा सन्मान समजतो. ही जागतिक दर्जाची स्पर्धा असून, त्याचे वैभव अधिक वृद्धिंगत करण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन. आयपीएल अध्यक्षपदाच्या मागील कार्यकाळाचा अनुभव माझ्या गाठीशी आहे. या स्पध्रेत आवश्यक असलेल्या सुधारणा करण्यात येतील.
-राजीव शुक्ला

Story img Loader