भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) माजी फिरकीपटू रमेश पोवारची महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नेमणूक केली आहे. बीसीसीआयने या पदासाठी अर्ज मागवले होते आणि ३५हून अधिक जणांनी या पदासाठी आपले नाव दिले होते.
NEWS: Ramesh Powar appointed Head Coach of Indian Women’s Cricket team
Details https://t.co/GByGFicBsX pic.twitter.com/wJsTZrFrWF
— BCCI Women (@BCCIWomen) May 13, 2021
सुलक्षणा नाईक, मदन लाल आणि रुद्र प्रताप सिंह यांच्या तीन सदस्यीय क्रिकेट सल्लागार समितीने अर्जदारांची मुलाखत घेतली आणि पोवारच्या नावावर एकमताने सहमती दर्शविली.
रमेश पोवारने भारताकडून २ कसोटी आणि ३१ एकदिवसीय सामने खेळले आहेत. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर पोवारने प्रशिक्षणाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. यंदाची विजय हजारे ट्रॉफी स्पर्धा जिंकणार्या मुंबई संघाचा पोवार प्रशिक्षक होता. त्याने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये गोलंदाजी प्रशिक्षक म्हणूनही काम केले आहे.
मिताली राजशी झाला होता वाद
२०१८मध्ये झालेल्या टी-२० वर्ल्डकप दरम्यान रमेश पोवार भारतीय महिला संघाचा प्रशिक्षक होता. त्यावेळी मिताली राजशी झालेला वाद चर्चेत आला होता. वर्ल्डकपच्या उपांत्य सामन्यात मितालीला खेळू न दिल्यामुळे हा वाद सुरू झाला. नंतर पोवारला या पदावरून हटविण्यात आले. मिताली राज सध्या भारतीय एकदिवसीय आणि कसोटी संघाची कर्णधार आहे.