"त्याचा बाप कमिश्नर असल्याने तो..."; पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजांना वसिम आक्रमचा खोचक टोला | Ramiz Raja dropped more than he caught fielded at slips because his father was a commissioner Wasim Akram scsg 91 | Loksatta

“त्याचा बाप कमिश्नर असल्याने तो…”; पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजांना वसिम आक्रमचा खोचक टोला

आक्रमने १९८४ साली पकिस्तानी संघातून पदार्पण केलं होतं

“त्याचा बाप कमिश्नर असल्याने तो…”; पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजांना वसिम आक्रमचा खोचक टोला
पुस्तकामधून लगावला टोला (फोटो – ट्विटरवरुन साभार)

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसिम आक्रम सध्या चर्चेत आहे. आक्रमने लिहिलेल्या ‘सुल्तान : अ मेमरी’ या पुस्तकामुळे तो सध्या चर्चेत असून या पुस्तकात त्याने अनेक धक्कादायक खुलासे आणि दावे केले आहेत. कर्णधार सालीम मलिक आपल्याला नोकरासारखी वागणूक द्यायचा असं आक्रमने म्हटलं आहे. विशेष म्हणजे या पुस्तकामध्ये पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे विद्यमान अध्यक्ष रमीझ राजा यांच्यावरही आक्रमने निशाणा साधला आहे.

आक्रमने राजा यांच्या क्षेत्ररक्षणावर टीका केली आहे. खोचक शब्दांमध्ये टोला लगावत राजा हे स्लीपमध्येच क्षेत्ररक्षण करायचे. याच ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्यामागील कारणाबद्दल दावा करताना आक्रमने राजा यांचे वडील कमिश्नर असल्याचा संदर्भ जोडला आहे. वडील उच्चपदस्थ अधिकारी असल्याने राजा यांना स्लीपमध्ये क्षेत्ररक्षण करण्याची सवलत दिली जायची असा आक्रमच्या विधानाचा सूर आहे.

“पुढल्या दिवशी पहिलं षटक आसिफ फर्दीने टाकलं. तो वेगवान गोलंदाज होता. मी दुसरं षटक टाकलं. मी माझं चौथ षटक टाकत असताना न्यूझीलंडचा कर्णधार जॉन राईटच्या बॅटची कड घेऊन सेकेण्ड स्लीपमध्ये गेला. रमीझ राजा हा त्या (स्लीपमध्ये) ठिकाणी उभं असण्याचं कारण म्हणजे त्याचे वडील कमिश्नर होते आणि तो अचिस्टन कॉलेजमधून शिकला होता. खरं तर त्याने जितके झेल घेतले त्यापेक्षा अधिक सोडले आहेत,” असं आक्रमने पुस्तकात लिहिलं आहे.

नक्की पाहा >> कहर! फलंदाजांच्या नादात पाकिस्तानी विकेटकीपरच दोन धावा पळाला; सामन्यातील मजेदार Video होतोय Viral

याच पुस्तकामध्ये आक्रमने मलिकवर टीका केली आहे. पाकिस्तानी संघामध्ये आक्रम नवीन खेळाडू म्हणून दाखल झाला होता तेव्हा त्याला नोकरासारखी वागणूक दिल्याचा दावा करण्यात आला आहे. “मी ज्युनियर असल्याचा त्याने फायदा घेतला. तो फार नकारात्मक, स्वार्थी होता त्याने मला नोकरासारखं वागवलं. त्याने मला मसाज करायलाही सांगितलं होतं. त्याने मला त्याचे कपडे आणि बूटही साफ करायला लावले होते,” असं आक्रमने म्हटलं आहे. आक्रमने १९८४ साली पकिस्तानी संघातून पदार्पण केलं होतं. मलिक हा त्याला दोन वर्ष ज्येष्ठ होता. त्याने १९८२ साली पदार्पण केलं होतं.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-11-2022 at 19:12 IST
Next Story
IND vs NZ ODI: मालिका गमावल्यानंतर शिखर धवनने दिली प्रतिक्रिया; म्हणाला, ‘आम्ही अपेक्षेपेक्षा जास्त…’