scorecardresearch

काझीचेही शतक; महाराष्ट्राच्या ४६२ धावा

दुसऱ्या दिवशी ४ बाद २९६ वरून पुढे खेळणाऱ्या महाराष्ट्राला धावसंख्येत १५० हून अधिक धावांची भर घालण्यात यश आले.

सुलतानपूर : कर्णधार अंकित बावणे (१४० धावा) पाठोपाठ अझीम काझीने (११३) साकारलेल्या शतकामुळे उत्तर प्रदेशविरुद्धच्या रणजी करंडक लढतीच्या पहिल्या डावात महाराष्ट्राने ४६२ धावांची मजल मारली. प्रत्युत्तरात, दुसऱ्या दिवसअखेर उत्तर प्रदेशची पहिल्या डावात १ बाद ६२ अशी स्थिती होती.

दुसऱ्या दिवशी ४ बाद २९६ वरून पुढे खेळणाऱ्या महाराष्ट्राला धावसंख्येत १५० हून अधिक धावांची भर घालण्यात यश आले. बावणे १४० धावांवर बाद झाल्यानंतर डावखुऱ्या काझीने महाराष्ट्राच्या डावाची सूत्रे हाती घेतली. त्याने संयमाने फलंदाजी करताना २४३ चेंडूंत १३ चौकार आणि एका षटकाराच्या साहाय्याने ११३ धावांची खेळी केली. हे त्याचे प्रथम श्रेणी कारकीर्दीतील दुसरे शतक ठरले. त्याला तळाच्या सत्यजीत बच्छाव (१९) आणि तरणजीतसिंग (१९) यांची साथ लाभल्याने महाराष्ट्राने साडेचारशे धावांचा टप्पा ओलांडला.

संक्षिप्त धावफलक

महाराष्ट्र (पहिला डाव) : १४७.१ षटकांत सर्वबाद ४६२ (अंकित बावणे १४०, अझीम काझी ११३; जसमेर धनखड ३/८३)

उत्तर प्रदेश (पहिला डाव) : ३२ षटकांत १ बाद ६२ (प्रियम गर्ग नाबाद २९; विकी ओस्तवाल १/१४)

विदर्भ अडचणीत

कर्णधार फैज फझलच्या (१६२ चेंडूंत ८६ धावा) झुंजार अर्धशतकानंतरही आसामविरुद्धच्या रणजी करंडकातील लढतीत विदर्भाचा संघ अडचणीत सापडला. आसामच्या ३१६ धावांचे उत्तर देताना दुसऱ्या दिवसअखेर विदर्भाची पहिल्या डावात ९ बाद २६५ अशी स्थिती होती. ते ५१ धावांनी पिछाडीवर होते.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ranji trophy 2022 maharashtra score 462 against uttar pradesh on second day zws