Ranji Trophy 2024 Semi Final Updates : रणजी ट्रॉफी हंगाम २०२४ चा पहिला उपांत्य सामना विदर्भ आणि मध्य प्रदेश यांच्यात खेळला जात आहे, तर दुसरा उपांत्य सामना मुंबई आणि तामिळनाडू यांच्यात खेळवला जात आहे. पहिल्या उपांत्य सामन्यात मध्य प्रदेशने विदर्भाला पहिल्या डावात अवघ्या १७० धावांत गुंडाळले. दुसऱ्या उपांत्य सामन्यात अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबईविरुद्ध तामिळनाडूची फलंदाजी पहिल्या डावात सपशेल अपयशी ठरली. संपूर्ण संघ १४६ धावांवर गारद झाला.
तुषार देशपांडेने घेतल्या सर्वाधिक ३ विकेट्स –
मुंबईविरुद्धच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात तामिळनाडूने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय तामिळनाडूच्या फलंदाज योग्य ठरवण्यात अपयशी ठरले. कारण या संघाचे फलंदाज मुंबईच्या घातक गोलंदाजीसमोर शरणागती पत्करताना दिसले. तामिळनाडूकडून विजय शंकरने सर्वाधिक ४४ धावा केल्या, तर वॉशिंग्टन सुंदरने ४३ धावांची खेळी केली. पहिल्या डावात साई किशोरने केवळ एका धावेची खेळी केली, तर मुंबईकडून तुषार देशपांडेने पहिल्या डावात सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या, तर शार्दुल ठाकूर, मुशीर खान आणि तनुष कोटियन यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तसेच मोहित अवस्थीला एक विकेट मिळाली.
मुंबई पहिला दिवस अखेर १०१ धावांनी पिछाडीवर –
तामिळनाडूच्या १४६ धावांच्या प्रत्युत्तरात मुंबई संघ पहिला दिवस अखेर १०१ धावांनी पिछाडीवर आहे. मुंबई संघाने १७ षटकानंतर २ बाद ४५ धावा केल्या आहेत. पृथ्वी शॉ (५) आणि भूपेन ललवाणी (१५) बाद झाले आहेत. सध्या मुशीर खान (२४) मोहित अवस्थी (१) नाबाद आहेत. तामिळानाडूकडून कुलदीप सेन आणि साई किशोरने प्रत्येकी एक विकेट घेतली.
आवेश खानने घेतल्या सर्वाधिक ४ विकेट्स –
या मोसमातील पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात विदर्भाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु संघाला केवळ १७० धावापर्यंतच मजल मारता आली. विदर्भासाठी करुण नायरने सर्वाधिक ६३ धावांची खेळी साकारली, तर अथर्व तायडेने ३९ धावांचे योगदान दिले, तर ध्रुव शौरेने या महत्त्वाच्या सामन्यात १३ धावांची खेळी केली.
हेही वाचा – IPL 2024 : लखनऊ सुपर जायंट्स संघात मोठा बदल, दक्षिण आफ्रिकेच्या ‘या’ दिग्गजाची एन्ट्री
मध्यप्रदेश पहिला दिवस अखेर १२३ धावांनी पिछाडीवर –
मध्य प्रदेशकडून आवेश खानने अप्रतिम गोलंदाजी करताना सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तसेच कुलवंत खजरोलिया आणि व्यंकटेश अय्यर यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. विदर्भाच्या १७० धावांच्या प्रत्युत्तरात मध्यप्रदेश संघ पहिला दिवस अखेर १२३ धावांनी पिछाडीवर आहे. मध्यप्रदेश पहिल्या डावात पहिला दिवस अखेर २० षकानंतर १ बाद ४७ धावा केल्या आहेत. यश दुबे ११ धावांचे योगदान देऊन पहिल्या विकेट्सच्या रुपाने बाद झाला. त्याला उमेश यादवने अक्षय वाडकरच्या हाती झेलबाद केले.