चंडीगड : मुकेश चौधरी (४/३४) आणि रामकृष्ण घोष (४/७१) या वेगवान गोलंदाजांनी केलेल्या टिच्चून माऱ्याच्या जोरावर महाराष्ट्राने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत ‘ब’ गटातील सामन्यात मंगळवारी चंडीगडचा १४४ धावांनी पराभव केला. या विजयानंतर महाराष्ट्राचे दोन सामन्यांत नऊ गुण झाले असून गटात ते आघाडीवर आले आहेत.

ऋतुराज गायकवाडचे शतक, त्यानंतर विकी ओस्तवालची प्रभावी गोलंदाजी यामुळे महाराष्ट्राने पहिल्या डावात आघाडी मिळवली होती. त्यानंतर दुसऱ्या डावात पृथ्वी शॉ याने केलेल्या वेगवान द्विशतकी खेळीने महाराष्ट्राला चंडीगडसमोर भक्कम आव्हान उभे करता आले आणि याचा बचाव करण्यासाठी गोलंदाजांनाही पुरेसा वेळ मिळाला. अशा एकत्रित सांघिक प्रयत्नांच्या जोरावर महाराष्ट्राने हंगामातील पहिला विजय नोंदवला.

विजयासाठी ४६४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चंडीगडने तिसऱ्या दिवशी १ बाद १२९ अशी मजल मारली होती. सामन्याच्या अखेरच्या दिवशी आणखी ३३५ धावांचा पाठलाग करताना चंडीगडच्या फलंदाजांनी झुंजार खेळ केला. मात्र, महाराष्ट्राच्या गोलंदाजांनीही तेवढीच टिच्चून गोलंदाजी केल्यामुळे सामन्यातील रंगत अखेरपर्यंत कायम राहिली होती.

एकीकडे सलामीचा फलंदाज अर्जुन आझाद (२३६ चेंडूंत १६८ धावा) चंडीगडच्या विजयासाठी प्रयत्नांची शिकस्त करत होता. मात्र, त्याला समोरून कर्णधार मनन वोहरा (५८) आणि राज अंगद बावा (४२) वगळता एकाचीही साथ लाभली नाही. अर्जुन आणि वोहरा यांच्यात दुसऱ्या गड्यासाठी १३४ धावांची भागीदारी झाली. ही जोडी फुटल्यावर चंडीगडचा डाव ४ बाद १६० असा अडचणीत आला.

रमन बिश्नोई शून्यावर, तर अंकित कौशिक ९ धावांवर बाद झाले. त्यानंतर अर्जुनने राज अगंद बावाच्या साथीत पाचव्या गड्यासाठी १२१ धावा जोडल्या. ही जमलेली जोडी जलज सक्सेनाने मोडली. त्यानंतर मुकेश आणि घोष यांनी ११ धावांत चंडीगडचे अखेरचे पाच फलंदाज बाद करून महाराष्ट्राच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

कारकीर्दीत केवळ दुसराच सामना खेळताना अर्जुनचे हे दुसरे शतक ठरले. पदार्पणाच्या सामन्यात अर्जुनने गोवाविरुद्ध १४१ धावांची खेळी केली होती.

संक्षिप्त धावफलक

महाराष्ट्र (पहिला डाव) : ३१३

चंडीगड (पहिला डाव) : २०९

महाराष्ट्र (दुसरा डाव) : ३ बाद ३५९ घोषित चंडीगड (दुसरा डाव) : ९४.१ षटकांत सर्वबाद ३१९ (अर्जुन आझाद १६८, मनन वोहरा ५८; मुकेश चौधरी ४/३४, रामकृष्ण घोष ४/७१)