मुंबई : डावखुरा फिरकीपटू शम्स मुलानीच्या (५/५९) प्रभावी माऱ्यामुळे मुंबईला रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील छत्तीसगडविरुद्धच्या अनिर्णित राहिलेल्या सामन्यात पहिल्या डावातील आघाडीचे समाधान लाभले. त्यामुळे मुंबईने तीन गुणांची कमाई केली. या निकालानंतर मुंबईचे दोन सामन्यांत नऊ गुण झाले असून ‘ड’ गटात त्यांनी अग्रस्थान राखले आहे.

वांद्रे कुर्ला संकुल येथील ‘एमसीए’ शरद पवार क्रिकेट अकादमीच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात पहिले तीन दिवस पावसाने अनेकदा व्यत्यय आणला. त्यामुळे बरीच षटके वाया गेली. त्यानंतरही मुंबईने विजयाची संधी निर्माण केली होती. मुंबईच्या ४१६ धावांच्या प्रत्युत्तरात सामन्याच्या अखेरच्या दिवशी छत्तीसगडचा पहिला डाव २१७ धावांवर आटोपला. त्यानंतर मुंबईने प्रतिस्पर्ध्यांना फॉलोऑन दिला. परंतु पहिल्या डावातील अर्धशतकवीर आयुष पांडेने दुसऱ्या डावात १७१ चेंडूंत नाबाद ११७ धावांची खेळी करताना मुंबईला विजयापासून दूर ठेवले. छत्तीसगडची दुसऱ्या डावात ३ बाद २०१ अशी धावसंख्या असताना सामना संपविण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्याआधी, सामन्याच्या चौथ्या आणि अखेरच्या दिवशी ६ बाद १७६ धावांवरून पुढे खेळणाऱ्या छत्तीसगडचा पहिला डाव २१७ धावांवर संपुष्टात आला. मुलानीने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना छत्तीसगडच्या अखेरच्या चारपैकी तीन फलंदाजांना माघारी धाडले. तर शशांक सिंहचा (३३) अडसर ऑफ-स्पिनर हिमांशू सिंहने दूर केला.

मुंबईने रणजी स्पर्धेच्या नव्या हंगामातील पहिल्या लढतीत जम्मू-काश्मीरला पराभूत केले होते. त्यात मुलानीने अनुक्रमे ९१ आणि ४१ धावा करतानाच दोन डावांत मिळून नऊ बळीही मिळवले होते. पाठोपाठ छत्तीसगडविरुद्ध फलंदाजीत ३९ धावा केल्यानंतर त्याने गोलंदाजीत प्रतिस्पर्ध्यांचा निम्मा संघ गारद करत पुन्हा एकदा अष्टपैलू चमक दाखवली. पहिल्या डावात १५९ धावांची खेळी करणाऱ्या अजिंक्य रहाणेला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.

संक्षिप्त धावफलक

मुंबई (पहिला डाव) : ४१६

छत्तीसगड (पहिला डाव) : ७६.५ षटकांत सर्वबाद २१७ (आयुष पांडे ५०, शशांक चंद्राकर ४३; शम्स मुलानी ५/५९, हिमांशू सिंह ३/४२, मुशीर खान २/३८)

छत्तीसगड (दुसरा डाव) : ५८ षटकांत ३ बाद २०१ (आयुष पांडे नाबाद ११७, संजीत देसाई २६; मुशीर खान १/३१, हिमांशू सिंह १/६५, शम्स मुलानी १/८१)