आगामी श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाचे दरवाजे ठोठावणारी शतकी खेळी अजिंक्य रहाणेने गुरुवारी साकारली. रहाणे आणि सर्फराज खान यांनी नाबाद शतके करून सौराष्ट्रविरुद्धच्या रणजी करंडक क्रिकेट लढतीत मुंबईला पहिल्या डावात ३ बाद २६३ अशा सुस्थितीत राखले.

ड-गटाच्या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. पण सकाळच्या सत्रात कर्णधार पृथ्वी शॉ (१), आकर्षित गोमेल (१) आणि सचिन यादव (१९) हे तीन फलंदाज तंबूत परतल्याने मुंबईची ३ बाद ४४ अशी अवस्था झाली. रहाणे आणि सर्फराज यांनी सावध फलंदाजी करीत चौथ्या गडय़ासाठी २१२ धावांची भागीदारी करीत डाव सावरला. रहाणेने ९९ धावांवर असताना डावखुरा फिरकी गोलंदाज धर्मेद्रसिंह जडेजाला षटकार खेचत प्रथम श्रेणी क्रिकेटमधील ३६वे शतक साकारले. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा रहाणेच्या खात्यावर २५० चेंडूंत १४ चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद १०८ धावा जमा होत्या. सर्फराजने २१९ चेंडूंत १५ चौकार आणि दोन षटकारांनिशी नाबाद १२१ धावा काढल्या आहेत.

नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील सहा डावांत रहाणेने केवळ १३६ धावा काढल्या. या मालिकेआधी त्याला उपकर्णधारपदही गमवावे लागले होते.

संक्षिप्त धावफलक

मुंबई (पहिला डाव) : ८७ षटकांत ३ बाद २६३ (सर्फराज खान खेळत आहे १२१, अजिंक्य रहाणे खेळत आहे १०८; जयदेव उनाडकट १/२३)