आजपासून वानखेडे स्टेडियमवर मध्य प्रदेशविरुद्धच्या लढतीला प्रारंभ

सर्वाधिक ४१ वेळा रणजी करंडकावर नाव कोरणाऱ्या माजी विजेत्या मुंबईचे यंदाच्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील आव्हान साखळीतच संपुष्टात आले आहे. त्यामुळे बुधवारपासून वानखेडे स्टेडियमवर रंगणाऱ्या मध्य प्रदेशविरुद्धची लढत मुंबईसाठी एक प्रकारे प्रदर्शनीय सामना असणार आहे.

मुंबईच्या खात्यात सात सामन्यांतून अवघा एक विजय, दोन पराभव आणि चार अनिर्णित सामन्यांचे एकूण १४ गुण जमा असून एलिट गुणतालिकेत ते १४व्या स्थानी आहेत. त्यामुळेच शेवट गोड करण्यासाठी मुंबईचे खेळाडू उत्सुक असतील.

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील या संघात सर्फराज खान, आदित्य तरे, सिद्धेश लाड यांसारख्या गुणवान फलंदाजांचा भरणा आहे. गोलंदाजीत मुंबईची मदार तुषार देशपांडे, शशांक अत्तार्डे, रॉयस्टन डायस यांच्यावर आहे. दुसरीकडे नमन ओझाच्या कर्णधारपदाखाली खेळणाऱ्या मध्य प्रदेशची आवेश खान, ईश्वर पांडे, अजय रोहेरा या खेळाडूंवर प्रामुख्याने भिस्त आहे.

सामन्याची वेळ : सकाळी ९.३० वा.