फॉलोऑननंतर आसामच्या दुसऱ्या डावात ५ बाद ३६ धावा; २८१ धावांनी पिछाडीवर

Ranji Trophy Cricket Tournamentगुवाहाटी : डावखुरा फिरकीपटू शम्स मुलानीच्या (४/१११) प्रभावी माऱ्यामुळे रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील ब-गटाच्या सामन्यात मुंबईने आसामचा पहिला डाव ३७० धावांवर रोखला. पहिल्या डावात ३१७ धावांची आघाडी मिळवल्यानंतर मुंबईने आसामला फॉलोऑन दिला. दुसऱ्या डावात आसामची सुरुवात अडखळती झाली. तिसऱ्या दिवसअखेर त्यांची ५ बाद ३६ अशी स्थिती होती. त्यामुळे अखेरच्या दिवशी मुंबईला विजयासाठी पाच बळींची आवश्यकता असून आसाम २८१ धावांनी पिछाडीवर आहे.

तिसऱ्या दिवशी आसामने पहिल्या डावात १ बाद १२९ धावसंख्येवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. त्यांच्या राहुल हजारिका (७९), रिषव दास (७५), कर्णधार गोकुल शर्मा (७०) आणि अभिषेक ठाकुरी (५१) यांच्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही फलंदाजांना फारशी चुणूक दाखवता आली नाही. मुंबईकडून मुलानीने चार बळी मिळवले. त्याला शार्दूल ठाकूर (२/६८), मोहित अवस्थी (२/६०) आणि तनुष कोटियन (२/५६) यांची चांगली साथ लाभली.
फॉलोऑन मिळाल्यावर आसामची अवस्था आणखी बिकट झाली. शार्दूल (३/१२) आणि अवस्थी (२/१९) यांच्या भेदक माऱ्यापुढे आसामच्या आघाडीची फळी ढेपाळली.