रणजी क्रिकेट स्पर्धा

प्रथम फलंदाजी करताना साडेतीनशेची मजल मारल्यानंतर विदर्भने भेदक गोलंदाजी करताना महाराष्ट्राला अडचणीत आणले. विदर्भच्या ३३२ धावसंख्येसमोर खेळताना दुसऱ्या दिवसअखेर महाराष्ट्राची ६ बाद १४४ अशी अवस्था झाली आहे. चिराग खुराणा १९ तर श्रीकांत मुंढे प्रत्येकी सात धावांवर खेळत आहेत. महाराष्ट्राचा संघ अजूनही १८८ धावांनी पिछाडीवर आहे.

तत्पूर्वी ४ बाद २२७ वरून पुढे खेळणाऱ्या विदर्भने संथ गतीने वाटताल करताना १०५ धावांची भर घातली. सलामीवीर फैझ फझल कालच्या धावसंख्येत दहा धावांची भर घालून बाद झाला. त्याने १६ चौकारांसह १२० धावांची खेळी केली. रवी जंगिडने ४० तर आदित्य सरवाटेने ३३ धावांची खेळी केली. महाराष्ट्रातर्फे श्रीकांत मुंढे आणि अनुपम संकलेचा यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले.

प्रत्युत्तरादाखल खेळताना स्वप्निल गुगळे आणि हर्षद खडीवाले यांनी ४३ धावांची संयमी सलामी दिली. फझलने गोलंदाजीतही चमक दाखवताना खडीवालेला बाद केले. त्याने १६ धावा केल्या. अर्धशतकाकडे कूच करणाऱ्या स्वप्निलला रवीकुमार ठाकूरने बाद केले. त्याने ४२ धावा केल्या. कर्णधार रोहित मोटवानीला सरवटेने त्रिफळाचीत केले. त्याने २७ धावा केल्या. भरवशाच्या केदार जाधवला ठाकूरने तंबूत धाडले. त्याला ८ धावाच करता आल्या. अंकित बावणे मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. त्याने १२ धावा केल्या. श्रीकांत वाघने त्याला माघारी परतावले.

संक्षिप्त धावफलक

विदर्भ : (पहिला डाव) ३३२ (फैझ फझल १२०, शलभ श्रीवास्तव ६३, श्रीकांत मुंढे ३/६०, अनुपम संकलेचा ३/६० विरुद्ध महाराष्ट्र (पहिला डाव) ६ बाद १४४ (स्वप्निल गुगळे ४२, रवीकुमार ठाकूर २/२२)