Rashid Khan Creates History: अफगाणिस्तानचा कर्णधार आणि उत्कृष्ट फिरकीपटू रशीद खानने अजून एक मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. अफगाणिस्तानचा संघ सध्या पाकिस्तान आणि युएईसह तिरंगी टी-२० मालिका खेळत आहे. या मालिकेत आशिया चषक २०२५ च्या सरावाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. दरम्यान या मालिकेत अफगाणिस्तानचा संघ चांगली कामगिरी करत असून रशीद खानने आपल्या कामगिरीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना गमावल्यानंतर, रशीद खानच्या नेतृत्वाखालील अफगाणिस्तानने दमदार पुनरागमन केलं. १ आणि २ सप्टेंबरला झालेल्या सामन्यांमध्ये त्यांनी आधी यूएईला ३८ धावांनी पराभूत केलं आणि मग पाकिस्तानलाही १८ धावांनी पराभूत केलं. या विजयांमुळे अफगाणिस्तान आता तिरंगी मालिकेतील अंतिम फेरीत पोहोचण्याच्या उंबरठ्यावर आहे.
रशीद खानने टी-२० मध्ये घडवला इतिहास
अफगाणिस्तानच्या या सलग दोन विजयांमध्ये रशीद खानने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. यासह अफगाणिस्तान यंदाचा आशिया कप जिंकण्याचा प्रबळ दावेदार समोर आला आहे. यूएईविरुद्धच्या सामन्यात रशीदने ४ षटकांत फक्त २१ धावा देत ३ बळी घेतले. तर पाकिस्तानविरुद्ध त्याने ४ षटकांत ३० धावा देत २ बळी घेतले. २६ वर्षीय रशीद खान संघासाठी उत्कृष्ट कामगिरी करत आहे.
रशीद खानने आपल्या कमालीच्या कामगिरीच्या जोरावर नवा विक्रमही रचला. रशीद खान आता टी-२० क्रिकेट इतिहासात ५० विकेट्स घेणारा पूर्ण सदस्य असलेल्या देशाचा (फुल मेंबर नेशन) पहिला कर्णधार ठरला आहे. याआधी हा विक्रम शाकिब अल हसनच्या नावावर होता, पण डिसेंबरमध्ये झिम्बाब्वेविरुद्ध खेळताना रशीदने तो विक्रम मोडला होता आणि आता त्याने ५० अधिक विकेट्सचा आकडा गाठला आहे.
टी-२० मध्ये सर्वाधिक विकेट घेणारे कर्णधार (पूर्ण सदस्य देश)
रशीद खान (अफगाणिस्तान) – ५४ विकेट्स
शाकिब अल हसन (बांगलादेश) – ४६ विकेट्स
टीम साऊदी (न्यूझीलंड) – ४३ विकेट्स
शाहिद आफ्रिदी (पाकिस्तान) – ४० विकेट्स
सिकंदर रझा (झिम्बाब्वे) – ४० विकेट्स
क्रिकेटमधील पूर्ण सदस्य देश असलेले संघ
अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, आयर्लंड, पाकिस्तान, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, वेस्ट इंडीज, झिम्बाब्वे
दोन दिवसांपूर्वीच रशीद खानने टिम साऊदीला मागे टाकत टी-२० मधील सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनला. न्यूझीलंडचा दिग्गज खेळाडू टिम साऊदीने टी-२० मध्ये १६५ बळी घेतले होते, पण रशीदने त्याचा विक्रम मोडला. सध्या रशीदने टी-२० मध्ये एकूण १६७ बळी घेतले आहेत, त्यापैकी १६५ अफगाणिस्तानसाठी आणि २ आयसीसी इलेव्हनसाठी घेतले आहेत.