भारतीय युवा संघाचा फिरकीपटू रवी बिश्नोईने दक्षिण आफ्रिकेत आपल्या फिरकीच्या जादूने सर्वांना प्रभावित केलं आहे. बांगलादेशविरुद्ध अंतिम सामन्यात रवी बिश्नोईने भेदक मारा करत ३ बळी घेतले. भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना १७७ धावांपर्यंत मजल मारली. १७८ धावांचा पाठलाग करताना बांगलादेशच्या संघाची अतिशय आश्वासक सुरुवात केली.

मात्र रवी बिश्नोईने आपल्या फिरकीच्या जाळ्यात बांगलादेशी फलंदाजांना अडकवत सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली. एका क्षणाला वरचढ वाढणारा बांगलादेशचा संघ बिश्नोईच्या प्रभावी माऱ्यामुळे बॅकफूटला ढकलला गेला. बिश्नोईने तंझिद हसन, मोहमदुल हसन जॉय, तौहिद हृदॉय आणि शाहदत हुसैनला माघारी धाडलं. रवीने १० षटकांत ३ षटकं निर्धाव टाकत केवळ ३० धावा देत ४ बळी घेतले. १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत ही दुसरी सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.

एकही सामना न गमावता अंतिम फेरीचं तिकीट गाठणाऱ्या भारतीय संघाला बांगलादेशचे चांगलीच झुंज दिली. रवी बिश्नोईला सुशांत मिश्राने २ तर यशस्वी जैस्वालने १ बळी घेत चांगली साथ दिली. दरम्यान स्पर्धेत १७ बळी घेत बिश्नोई सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाजही ठरला आहे.