मस्कत : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत पराभव पत्करावा लागला असला तरी यामुळे विनाकारण चिंता करून संघात फारसे बदल करण्यावर भर देऊ नये, असे मत भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले.

के. एल. राहुलच्या नेतृत्वाखालील भारताला आफ्रिकेविरुद्धची एकदिवसीय मालिका ०-३ अशी गमवावी लागली. रोहित शर्माची अनुपस्थिती तसेच विराट कोहलीची कर्णधारपदावरून हकालपट्टी या बाबींचा भारतीय खेळाडूंच्या कामगिरीवर परिणाम झाल्याचे म्हटले जात आहे.

‘‘एखाद्या एकदिवसीय मालिकेतील सर्व सामने गमावल्यामुळे भारतीय खेळाडूंवर कडाडून टीका करू नका. भारतीय संघ सध्या कठीण कालखंडातून जात असला तरी लवकरच तो लौकिकाला साजेसा खेळ करेल. पाच वर्षे आपण कसोटी क्रमवारीत अग्रस्थानी होतो. तसेच एकदिवसीय मालिकांमध्येही आपले यश कौतुकास्पदच आहे,’’ असे शास्त्री म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘‘कोहलीच्या नेतृत्व सोडण्याच्या निर्णयाचा आदर करणे गरजेचे आहे. यापूर्वीही सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंह धोनी यांसारख्या महान खेळाडूंनीही त्यांच्या मनाप्रमाणे नेतृत्वपदाचा राजीनामा दिला. आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील मी एकही चेंडू पाहिला नाही. त्यामुळे कोहलीच्या देहबोलीत कर्णधारपद सोडल्यामुळे काही फरक झाला आहे का, हे सांगणे कठीण आहे,’’ असेही शास्त्री म्हणाले.