भारतीय क्रिकेट संघ सध्या बदलाच्या काळातून जात आहे. विराट कोहलीच्या जागी रोहित शर्माला टी-२० आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. त्याआधी रवी शास्त्री २०२१च्या टी-२० वर्ल्डकपनंतर टीम इंडियापासून वेगळे झाले होते. मुख्य प्रशिक्षक म्हणून शास्त्री यांचा पहिला कार्यकाळ २०१७ मध्ये सुरू झाला त्यानंतर २०१९ मध्ये त्यांची पुन्हा नियुक्ती झाली. आता त्याच्या जागी राहुल द्रविडने टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. शास्त्री आणि कोहली जोडीने तिन्ही फॉरमॅटमध्ये थैमान घातले, पण आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात त्यांना अपयश आले. पहिल्या प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ आठवून शास्त्री यांनी खळबळजनक खुलासा केला आहे. बीसीसीआयमधील काही लोकांना मी भारतीय संघाचा प्रशिक्षक बनू नये अशी इच्छा होती, असे शास्त्रींनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत शास्त्री म्हणाले, ”बीसीसीआयमध्ये काही लोक उपस्थित होते, ज्यांना मला टीम इंडियाचा कोच बनवायचे नव्हते. २०१४च्या अ‍ॅडलेडमध्ये कसोटीदरम्यान धोनीच्या जागी विराट कप्तान झाला. तो बदल पूर्ण होण्याआधीच मला अचानक बाहेर काढण्यात आले. या निर्णयामुळे मला दु:ख झाले आहे, कारण मला ज्या पद्धतीने हटवण्यात आले ते योग्य नव्हते. जवळपास ९ महिने उलटले आणि हीच मंडळी माझ्याकडे पुन्हा आली. संघात समस्या असल्याचे मला सांगण्यात आले. मला समस्या काय आहे, हे समजत नव्हते. ”

हेही वाचा – ‘‘रोहित शर्मा हा नेहमी…”, विराटला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर रवी शास्त्रींचं ‘मोठं’ वक्तव्य; एकदा वाचाच!

२०१७च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये टीम इंडियाला पाकिस्तानविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला आणि त्यानंतर टीम इंडियाचे नवे मुख्य प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्री यांची निवड करण्यात आली.

भरत अरुण यांच्याबाबतही खुलासा

शास्त्री म्हणाले, ”भरत अरुण यांना मी गोलंदाजी प्रशिक्षक करू नये अशीही या लोकांची इच्छा होती. मी मागे वळून पाहतो तेव्हा ही परिस्थिती कशी बदलली हे मला जाणवते. त्यांना जी व्यक्ती गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नको होती, त्याने दमदार कामगिरी केली. आता त्यांच्या कामावर कुणालाही बोट दाखवता येत नाही. पण, काही खास व्यक्ती होत्या. त्यांनी मी हेड कोच बनू नये यासाठी जोरदार प्रयत्न केले.”

शास्त्रींच्या मार्गदर्शनाखाली भारत

शास्त्री यांच्या कार्यकाळात टीम इंडियाने एकूण ४३ कसोटी सामने खेळले, त्यात २५ जिंकले आणि १३ गमावले. ५ सामने अनिर्णित राहिले. एकदिवसीय सामन्यांबद्दल बोलायचे झाल्यास, टीम इंडियाने ७९ सामने खेळले ज्यात ५३ जिंकले. टी-२० क्रिकेटमध्ये शास्त्रींच्या मार्गदर्शनाखाली भारताने ६८ सामने खेळले, ज्यात त्यांना ४४ सामने जिंकता आले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ravi shastri revealed some people in bcci didnt want him as head coach adn
First published on: 10-12-2021 at 12:41 IST