* रोहित शर्माची नाबाद १६३ धावांची शानदार खेळी
* हिकेन शाह आणि कौस्तुभ पवारची अर्धशतके
* मुंबईची ३ बाद ३६४ अशी दमदार मजल
* मुंबई अजून २१६ धावांनी पिछाडीवर
नागपूर कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची निवड झालेली असली तरी आगामी सामन्यांसाठी पंजाबविरुद्धच्या रणजी सामन्यात नाबाद १६३ धावांची खेळी साकारत रोहित शर्माने आपली दमदार दावेदारी केली आहे. सोमवारी वानखेडेवर रोहितचा ‘हिट’ शो पाहायला मिळाला. संघ अडचणीत सापडलेला असताना रोहितने नाबाद दीडशतक झळकावल्याने मुंबईला तिसऱ्या दिवसअखेर ३ बाद ३६४ अशी मजल मारता आली. रोहितला या वेळी कौस्तुभ पवार आणि हिकेन शाह या अर्धशतकवीरांची चांगली साथ मिळाली. पहिले दोन दिवस गाजवणाऱ्या पंजाबला तिसऱ्या दिवशी मात्र मुंबईपुढे नमते घ्यावे लागले. मुंबई अजूनही २१६ धावांच्या पिछाडीवर असून मंगळवारी ते पहिल्या डावात आघाडी घेऊन तीन गुणांची कमाई करतात का, याकडेच साऱ्यांचे लक्ष लागलेले आहे.
सुदैवी ठरलेल्या आणि भारतीय संघात पदार्पण करण्यासाठी उत्सुक असलेल्या अजिंक्य रहाणेला (३१) मोठी खेळी साकारता आली नाही. पण कौस्तुभ पवारने मात्र संयमी फलंदाजी करत दहा चौकारांच्या मदतीने ७८ धावांची खेळी साकारत संघाला स्थैर्य मिळवून देण्याचा प्रयत्न केला. पण उपाहारापूर्वीच्याच षटकात त्याला हरभजनने बाद केले.
उपाहाराच्या वेळी मुंबईची ३ बाद १९३ अशी अवस्था होती, या वेळी रोहितने एका बाजूने पंजाबच्या गोलंदाजीवर प्रहार केला, तर हिकेनने संयमी खेळ करत त्याला चांगली साथ दिली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी १७१ धावांची अभेद्य भागीदारी रचल्यामुळे मुंबईचा संघ आघाडी मिळवण्याचे स्वप्न पाहत आहे. चहापानापूर्वी चोरटी एकेरी धाव घेत रोहितने मोसमातील दुसऱ्या शतकाला गवसणी घातली. चहापानानंतरच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत त्याने आपले इरादे स्पष्ट केले आणि आपल्या शैलीने त्याने पंजाबच्या गोलंदाजीचा समाचार घेतला. दिवसअखेर रोहितने १९ चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने नाबाद १६३ धावांची खेळी साकारली. हिकनने संयमी खेळ केला असला तरी त्याची खेळी बचावाचा उत्तम वस्तुपाठ दाखवणारी होती. ९०व्या चेंडूवर त्याने पहिला चौकार मारला आणि दिवसअखेर ५ चौकारांच्या मदतीने नाबाद ५४ धावांची खेळी साकारली.
संक्षिप्त धावफलक
पंजाब (पहिला डाव) : ५८०
मुंबई (पहिला डाव) : १०९ षटकांत ३ बाद ३६४ (रोहित शर्मा खेळत आहे १६३, कौस्तुभ पवार ७८, हिकेन शाह खेळत आहे ५४; सिद्धार्थ कौल १/५९)
संग्रहित लेख, दिनांक 11th Dec 2012 रोजी प्रकाशित
मुंबईचा रो‘हिट’ शो!
* रोहित शर्माची नाबाद १६३ धावांची शानदार खेळी * हिकेन शाह आणि कौस्तुभ पवारची अर्धशतके * मुंबईची ३ बाद ३६४ अशी दमदार मजल * मुंबई अजून २१६ धावांनी पिछाडीवर नागपूर कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची निवड झालेली असली तरी आगामी सामन्यांसाठी पंजाबविरुद्धच्या रणजी सामन्यात नाबाद १६३ धावांची खेळी साकारत रोहित शर्माने आपली दमदार दावेदारी केली आहे.

First published on: 11-12-2012 at 05:33 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raw hit show of mumbai