Phil Salt: सध्या इंग्लंडमध्ये द हंड्रेड क्रिकेट लीग स्पर्धेचा थरार सुरू आहे. १०० चेंडूंच्या या स्पर्धेत फलंदाजांकडून चौकार आणि षटकारांचा पाऊस पाहायला मिळत आहे. या स्पर्धेत झालेल्या सामन्यात मँचेस्टर ओरिजिनल्स आणि ओव्हल इनविंसिबल्स हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये जोरदार लढत पाहायला मिळाली. पण शेवटी मँचेस्टर ओरिजिनल्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या संघाला पराभवाचा सामना करावा लागला असला तरीदेखील या संघातील फलंदाज फिल सॉल्टने दमदार फलंदाजी केली. त्याने ३२ चेंडूंचा सामना करत ४१ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने १ चौकार ३ षटकार मारले. यादरम्यान त्याने मारलेला एक षटकार हा १०३ मीटर लांब होता. तसेच त्याने या स्पर्धेतील मोठा विक्रम देखील आपल्या नावावर केला आहे.

असा पराक्रम करणारा ठरला पहिलाच फलंदाज

द हंड्रेड क्रिकेट लीग स्पर्धा ही इंग्लंड क्रिकेट बोर्डाने सुरू केलेली क्रिकेट लीग स्पर्धा आहे. या स्पर्धेत डाव हा षटकांचा नसून चेंडूंचा असतो. १०० चेंडू टाकले गेले की एक डाव संपतो. दरम्यान या स्पर्धेत फिल सॉल्टने १००० धावांचा पल्ला गाठला आहे. यासह तो द हंड्रेड लीग स्पर्धेत १००० धावांचा पल्ला गाठणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे. याआधी कुठल्याही पुरुष क्रिकेटपटूला असा पराक्रम करता आलेला नाही. महिलांच्या क्रिकेटमध्ये नेट सिव्हर ब्रंटने १००० धावांचा पल्ला गाठला आहे. हा पल्ला त्याने १०३ मीटर लांब षटकार मारून गाठला आहे. साकीब महमूदच्या गोलंदाजीवर त्याने खणखणीत षटकार मारून इतिहासात आपलं नाव नोंदवलं आहे.

फिल सॉल्ट आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून खेळतो. या संघाला आयपीएलचं पहिलं जेतेपद मिळवून देण्यात त्याने मोलाची भूमिका बजावली. आता इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या द हंड्रेड लीग स्पर्धेतही त्याचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. सॉल्ट या स्पर्धेच्या पहिल्या हंगामापासून या स्पर्धेत खेळतोय. या स्पर्धेत त्याला आतापर्यंत ३७ सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. यादरम्यान त्याने १०३६ धावा केल्या आहेत. ज्यात ७ अर्धशतकांचा समावेश आहे. या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो अव्वल स्थानी पोहोचला आहे. तर या यादीत दुसऱ्या स्थानी असलेल्या जेम्स विन्सने ९८६ धावा केल्या आहेत.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या मँचेस्टर ओरिजिनल्स संघाने १०० चेंडूत १२८ धावा केल्या. या डावात फिल सॉल्टने सर्वाधिक ४१ धावांची खेळी केली. त्याला साथ देत मायकल चॅपमनने २८ धावांची खेळी केली. या दोघांना वगळलं, तर इतर फलंदाजांना हवी तशी कामगिरी करता आली नाही. ओव्हल इनविंसिबल संघाला हा सामना जिंकण्यासाठी १२९ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना तवांडा मुयेयेने ५९ आणि विल जॅक्सने ६१ धावांची दमदार खेळी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला.