रॉयल्स चँलेजर्स बंगळुरुने (आरसीबी) मला धोका दिला असं ख्रिस गेलने म्हटलं आहे. संघाचा महत्वाचा भाग असणाऱ्या ख्रिस गेलला यावेळी बंगळुरुने रिटेन केलंच नाही. अखेर पंजाबने दोन कोटींच्या बेस किंमतीवरच ख्रिस गेलची खरेदी केली आणि त्यांचं नशिबच पालटलं. आयपीएलमध्ये पुन्हा एकदा ख्रिस गेलचं वादळ घोंघावत असून यावेळी संघ मात्र बदलला आहे. आरसीबीने ख्रिस गेलची खरेदी न केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. अखेर ख्रिस गेलने यामागचा उलगडा करत आरसीबीने आपली फसवणूक केल्याचं म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आरसीबी मला रिटेन करणार होतं, मात्र ऐनवेळी त्यांनी आपला निर्णय बदलला असं ख्रिस गेलंच म्हणणं आहे. ‘मी त्यांचं खूप मोठं नुकसान ठरलो होतो. त्यांनी मला कॉल करुन रिटेन करणार आहोत असं सांगूनही न केल्याने माझ्यासाठी खूपच निराशाजनक होतं’, असं ख्रिस गेलने टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितलं आहे. ‘त्यांना मी संघात हवा होतो, आणि तुला रिटेन करु असंही त्यांनी मला सांगितलं होतं. पण त्यानंतर त्यांनी मला फोन केलाच नाही. त्यामुळे त्यांना कदाचित आता माझी गरज नसावी असंच मला वाटलं आणि मला त्याचा राग नाही’, असं ख्रिस गेल बोलला आहे.

पुढे बोलताना त्याने सांगितलं की, ‘मी कोणाशीही भांडू शकत नाही. सीपीएल आणि बीपीएलमध्ये मी दोन शतकं झळकावली आहेत. आकडे खोटं बोलत नाहीत. मी २१ शतकं आणि सर्वात जास्त षटाकर ठोकले आहेत. जर यावरुनही माझं कर्तृत्व सिद्ध होत नसेल तर मग कशाने होईल माहीत नाही’.

एकाही संघाने आपल्याला खरेदी करण्यात रस न दाखवल्यावरुन ख्रिस गेलने आश्चर्य व्यक्त केलं. किंग्स इलेव्हन पंजाबकडून खेळणं आपल्या नशिबात होतं असं त्याने म्हटलं आहे. ‘हे मी मान्य करतो की, कोणत्याही संघाने मला खरेदी न केल्याने खूप आश्चर्य वाटलं होतं. बंद दाराआड काय झालं मला माहित नाही, पण अशा गोष्टी होत असतात’, असं ख्रिस गेल बोलला आहे.

‘जे आहे ते तशाप्रकारे असतं, आणि ते ठीक आहे. मला पुढे जावं लागणार आहे. मी आधी सांगितल्याप्रमाणे, पंजाबकडून खेळणं माझ्यासाठी मोठी संधी आहे आणि मला खूप मजा येत आहे. हे होणारच होतं किंग गेलच्या नशिबात किंग्स पंजाबकडून खेळणं होतं’, असंही ख्रिस गेलने म्हटलं आहे. आयपीएल आणि वेस्ट इंडिजसाठी २०१९ वर्ल्ड कप जिंकणं आपलं मुख्य लक्ष्य असल्याचं त्याने सांगितलं आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rcb cheated me says chris gayle
First published on: 30-04-2018 at 16:50 IST