मध्यरक्षक कॅसेमिरोने केलेल्या अप्रतिम गोलमुळेच रिअल माद्रिद संघाला ला लीग फुटबॉल स्पर्धेत लास पाल्मस संघावर २-१ असा विजय मिळविता आला. चुरशीच्या झालेल्या या लढतीत सर्जिओ रामोसने उत्कृष्ट हेडर करत माद्रिद संघाचे खाते उघडले. मात्र लास पाल्मस संघाच्या विलियन होजेने खेळ संपण्यास तीन मिनिटे बाकी असताना गोल केला व १-१ अशी बरोबरी साधली. हा सामना बरोबरीत संपणार असे वाटले होते, मात्र कॅसेमिरो याने हेडरचाच उपयोग करीत संघाचा विजयी गोल नोंदविला. अन्य लढतीत सेव्हिला संघाने विलारिअल संघावर ४-२ अशी मात केली.
व्हॅलेन्सिया संघाला लेवान्टे संघाविरुद्ध ०-१ असा पराभव स्वीकारावा लागला. त्याआधी व्हॅलेन्सिया संघाला युरोपा लीगमध्ये अ‍ॅथलेटिक बिलबाओ संघाकडूनही याच फरकाने पराभव पत्करावा लागला होता. बिलबाओ संघाने रिअल बेटिस संघाचा ३-१ असा पराभव केला.