देशातील क्रीडा विकासाला गती मिळण्यासाठी या क्षेत्राला उद्योग क्षेत्राचा दर्जा देण्याची शिफारस भारतीय उद्योग महासंघाच्या समितीने केली आहे. महासंघाच्या नवी दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय परिषदेत या संदर्भात एक अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे.
देशात क्रीडा क्षेत्रासाठी अनुकूल वातावरण तयार होण्यासाठी व अन्य देशांप्रमाणे ऑलिम्पिक विजेते खेळाडू घडण्यासाठी या क्षेत्राला उद्योग क्षेत्राचा दर्जा देण्यात यावा, अशी शिफारस या अहवालात तयार करण्यात आली आहे. या अहवालाचे प्रकाशन केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण खात्याचे सचिव अजित शरण यांच्या हस्ते करण्यात आले. अन्य उद्योग क्षेत्रांप्रमाणेच क्रीडा क्षेत्रातही खासगी संस्था व गुंतवणूकदारांनी मोठय़ा प्रमाणावर गुंतवणूक करण्याची आवश्यकता असल्याचे या अहवालात म्हटले आहे. तसे झाल्यास क्रीडा क्षेत्रात आमूलाग्र प्रगती दिसून येईल. देशात  क्रीडाविषयक अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी शासन व खासगी क्षेत्रातील संस्थांचा चांगला समन्वय आवश्यक आहे.
याच कार्यक्रमात रंजन सोधी, मानवजितसिंग संधू, शगुन चौधरी (नेमबाजी), गौरव नाटेकर, मुस्तफा घौस (टेनिस), मंजुषा कन्वर, अमितकुमार दहिया (कुस्ती), रेनेडी सिंग (फुटबॉल), जुबिन कुमार (टेबल टेनिस), विशाखा विजय (टेबल टेनिस), जगदीप सिंग (कबड्डी) आदी खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
महासंघाच्या क्रीडा समितीचे अध्यक्ष अतुलसिंग म्हणाले की, ‘‘केवळ खेळासाठी प्रायोजकत्व देणे हे एकच काम नसून त्यापलीकडेही काम करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी क्रीडा क्षेत्र हा एक उद्योगच आहे असे मानणे जरुरीचे आहे. त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यात क्रीडा क्षेत्राला महत्त्व दिले जाईल. क्रीडा सुविधा निर्माण करणे, खेळाडूंना तांत्रिक सहकार्य देणे, नैपुण्यवान खेळाडूंना प्रोत्साहन देऊन त्यांचा विकास करण्याचे कामही महत्त्वाचे आहे.’’
नवी दिल्लीतील चर्चासत्रात देशातील क्रीडा संस्कृतीचा अभाव, खेळासाठी आर्थिक निधीचा अभाव, क्रीडा संस्थांच्या व्यवस्थापनात पारदर्शकतेचा अभाव या मुद्दय़ांवरही चर्चा करण्यात आली. या प्रश्नांवर काही उपाययोजनाही सुचविण्यात आल्या. सर्व राज्यांमध्ये समान क्रीडा धोरण अमलात आणणे, क्रीडा धोरणाची कडक अंमलबजावणी करणे या सूचना करण्यात आल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Recognising sports as an industry key to sports development
First published on: 26-02-2014 at 01:43 IST