पीटीआय, नवी दिल्ली : यंदा आशियाई क्रीडा स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या चीनमधील शांघाय आणि बीजिंग या शहरांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढताना दिसतो आहे. त्यामुळे आशियाई स्पर्धेपुढे संकट उभे ठाकले असून या स्पर्धेतील भारताच्या सहभागाबाबतचा निर्णय यजमान राष्ट्राशी चर्चा करून लवकरच घेतला जाईल, अशी माहिती केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी शनिवारी दिली.

चीनमधील प्रमुख आर्थिक केंद्र असलेल्या शांघाय शहरामध्ये महिन्याभरापासून टाळेबंदी लावण्यात आली असून राजधानी बीजिंगमध्येही निर्बंध अधिक कठोर करण्यात येत आहेत. त्यामुळे चीनमधील हांगजो येथे १० ते २५ सप्टेंबर या कालावधीत होणारी आशियाई क्रीडा स्पर्धा पुढे ढकलण्याबाबतही आयोजक विचार करत असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, यजमानांनी संपूर्ण माहिती देत हा गोंधळ दूर केला पाहिजे, असे ठाकूर यांना वाटते.  

‘‘चीनमधील सध्याची परिस्थिती त्यांच्याकडूनच जाणून घेणे गरजेचे आहे. आशियाई स्पर्धेत सहभागी होणाऱ्या अन्य राष्ट्रांमध्ये चर्चा सुरू आहे. भारतसुद्धा या स्पर्धेतील सहभागाबाबतचा अंतिम निर्णय लवकरच घेईल. मात्र, त्यापूर्वी यजमान राष्ट्राने तेथील परिस्थितीचा आणि त्यांच्या योजनांचा, तसेच ते या स्पर्धेच्या सुरक्षित आयोजनासाठी कशी तयारी करत आहेत, याबाबतची माहिती देणे आवश्यक आहे,’’ असे ठाकूर यांनी सांगितले.   

करोनाच्या पार्श्वभूमीवर, गेल्या दोन वर्षांत चीनमधील अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा रद्द कराव्या लागल्या. तर यावर्षी बीजिंग हिवाळी ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धाचे आयोजन करोनाचे सर्व नियम काटेकोरपणे पाळून करण्यात आले. या दोन्ही स्पर्धा प्रेक्षकांविनाच झाल्या. आता करोनाने पुन्हा डोके वर काढल्याने आशियाई क्रीडा स्पर्धेबाबतही साशंकता निर्माण झाली आहे.