भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकासाठी ऑस्ट्रेलियाचा महान क्रिकेटपटू रिकी पाँटिंगशी संपर्क साधला होता. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराने बीसीसीआयची ऑफर नाकारली. पाँटिंग सध्या आयपीएल फ्रेंचायझी दिल्ली कॅपिटल्सशी संबंधित आहे. त्यांच्या मार्गदर्शाखाली दिल्लीची टीम गेल्या तीन वर्षांपासून प्लेऑफमध्ये स्थान मिळवत आहे. याशिवाय, दिल्ली संघ आयपीएल २०२० चा उपविजेताही बनला.

टाइम्स ऑफ इंडियाच्या एका अहवालानुसार, पाँटिंगच्या नकाराचे कारण समोर आलेले नाही. आता राहुल द्रविड भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्री यांची जागा घेणार आहे. पाँटिंगने १९९५ साली आणि द्रविडने १९९६ मध्ये पदार्पण केले आणि दोन्ही खेळाडू २०१२ मध्ये निवृत्त झाले. दोघेही त्यांच्या काळातील महान खेळाडू होते. पाँटिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७१ शतकांसह २७,४८३ धावा केल्या आहेत, तर द्रविडने ४८ शतकांच्या मदतीने २४ हजारांहून अधिक धावा केल्या आहेत.

हेही वाचा – CSKकडून अतिशय आनंदाची बातमी; मेगा ऑक्शनमध्ये ‘या’ खेळाडूला केलं जाणार रिटेन!

द्रविड सुरुवातीला टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक बनण्यास तयार नव्हता, पण बीसीसीआयच्या आग्रहानंतर त्याने ते मान्य केले. ४८ वर्षीय द्रविड, सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA), बंगळुरूचा प्रमुख आहे. द्रविड १९ वर्षांखालील संघ आणि भारत अ संघाला प्रशिक्षणही देत आहे. अशाप्रकारे द्रविडला मुख्य संघाला प्रशिक्षण देण्यासाठी विचारणा झाल्याची ही काही पहिलीच वेळ नाही. मात्र द्रविडने तरुणांना क्रिकेटचे धडे देण्याला आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे काम पाहण्याला प्राधान्य दिले आहे. यापूर्वीही द्रविडने २०१६ आणि २०१७ साली अशाच पद्धतीची ऑफर नाकारली होती.