चेन्नई सुपर किंग्जला चौथ्यांदा आयपीएलचे जेतेपद मिळवून देणाऱ्या महेंद्रसिंह धोनीबद्दल मोठे वृत्त समोर आले आहे. सीएसकेच्या एका अधिकाऱ्याने खुलासा केला, की पुढच्या आयपीएल लिलावात धोनीसाठी पहिले रिटेन्शन कार्ड वापरले जाईल. पुढील वर्षीच्या हंगामासाठी एक मोठा लिलाव होणार आहे आणि दोन नवीन संघ देखील आयपीएलमध्ये सामील होणार आहेत. अशा स्थितीत सर्व संघांना त्यांच्या खेळाडूंची नव्याने निवड करावी लागेल. त्याचबरोबर त्याला काही खेळाडूंना कायम ठेवण्याचीही संधी मिळणार आहे.

चेन्नई सुपर किंग्जच्या अधिकाऱ्याच्या मते, फ्रेंचायझी प्रथम एमएस धोनीला कायम ठेवेल आणि त्यानंतर दुसऱ्या खेळाडूचा विचार केला जाईल. एएनआयशी संभाषण करताना एका अधिकाऱ्याने सांगितले, ”लिलावापूर्वी रिटेन्शन नक्कीच होईल, हे खरे आहे. किती खेळाडूंना कायम ठेवण्याची परवानगी दिली जाईल, याबद्दल आम्हाला माहिती नाही. तथापि, धोनी हा पहिला खेळाडू असेल जो आम्ही कायम ठेवू. या जहाजाला त्याच्या कॅप्टनची गरज आहे. चेन्नई सुपर किंग्जसाठी जे चांगले आहे ते आम्ही करू.”

हेही वाचा – ‘‘आता बाकीच्या देशांनी…”, द्रविड टीम इंडियाचा प्रशिक्षक होणार हे कळताच वॉननं केलं ट्वीट!

धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाइट रायडर्सला हरवून चौथ्यांदा आयपीएलचे जेतेपद पटकावले. धोनीच्या नेतृत्वाखाली ही चारही जेतेपदे चेन्नईने जिंकली आहेत. धोनीने २०१०, २०११, २०१८ आणि २०२१ चे विजेतेपद पटकावले आहे.

दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएल २०२१च्या अंतिम सामन्यात चेन्नईने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना तीन गडी बाद १९२ धावांची मजबूत धावसंख्या उभारली आणि नंतर त्यांच्या गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे कोलकाताला ९ बाद १६५ धावांपर्यंत रोखले.