Rinku Singh Takes Wicket on First Ball in UP Premiere League Video: उत्तर प्रदेश प्रीमियर लीग २०२५ (UPPL २०२५) स्पर्धेला सुरूवात झाली आहे. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात, रिंकू सिंहच्या संघाने विजयाने सुरूवात केली आहे. मेरठ मॅव्हेरिक्स संघाने कानपूर सुपरस्टार्सचा ८६ धावांनी पराभव करून मोहिमेला दणक्यात सुरूवात केली. मेरठचा कर्णधार रिंकू सिंगला फलंदाजीची संधी मिळाली नाही, पण त्याने गोलंदाजीत मात्र संघाला महत्त्वाची विकेट मिळवून दिली. ज्याचा व्हीडिओ आता व्हायरल होत आहे.

रिंकू सिंहने गोलंदाजी करताना कमालीच्या चेंडूवर फलंदाजाला त्रिफळाचीत केलं. त्याची गोलंदाजी पाहून समालोचकही आश्चर्यचकित झाले. शिवाय त्याने पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली त्यामुळे सर्वच जण अवाक् झाले.

रिंकू सिंह पॉवरप्लेमध्येच गोलंदाजी करायला आला. रिंकूने चौथं षटक टाकण्याची जबाबदारी घेतली. तो रनअप घ्यायच्या तयारीत असताना, समालोचक म्हणाले, “माझे डोळे तर ठिक आहेत ना? हे मी काय पाहतोय?” यानंतर रिंकूने पहिल्याच चेंडूवर विकेट घेत समालोचक अजून चकित झाले. रिंकूने पहिल्याच चेंडूवर आदर्श सिंगला बाद केलं.

रिंकू सिंह हा ऑफस्पिनर असून तो पार्ट टाईम गोलंदाज आहे. त्यामुळे फलंदाज त्याच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या तयारीत होता. फलंदाज स्टंप सोडून मोठा फटका खेळायला गेला आणि रिंकूचा योग्य लाईनवर टाकलेला चेंडू टप्पा पडून थेट स्टंपवर जाऊन आदळला. विकेट मिळताच रिंकूने गर्जना करत आक्रमक सेलिब्रेशन केलं आणि संघाला विकेट मिळवून दिली.

रिंकू सिंहने २ षटकांत १८ धावा देऊन १ विकेट घेतली. चौथ्या षटकानंतर त्याने शेवटचं षटक टाकलं. रिंकूच्या पहिल्या षटकात ५ धावा केल्या. सर्व धावा एकेरी धाव घेत फलंदाजांनी केल्या. यानंतर रिंकू अखेरचं षटक टाकण्यासाठी आला.

२० व्या षटकात फलंदाजी करणाऱ्या संघाने १३ धावा झाल्या. त्यात १ चौकार आणि १ षटकाराचा समावेश होता. रिंकूने भारताकडून टी-२० क्रिकेटमध्ये खेळतानाही गोलंदाजी केली आहे आणि विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या नावावर २ विकेट्स आहेत. गेल्या वर्षी श्रीलंकेविरुद्ध त्याने एका षटकात ३ धावा देऊन २ विकेट्स घेतल्या होत्या. टी२० मध्ये त्याच्या नावावर ५ विकेट्स आहेत.