रणजी ट्रॉफी २०२५-२६मध्ये उत्तर प्रदेश व तमिळनाडू यांच्यात सामना खेळवला जात आहे. या सामन्यात युपीचा संघासाठी रिंकू सिंह तारणहार ठरला. रिंकूने या सामन्यात शतक झळकावत संघाचा डाव सावरला. रिंकूने त्याच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत गेल्या ५३ सामन्यांमध्ये नववं शतक झळकावलं. रिंकूच्या या शतकामुळे संघाने ३५० धावांचा पल्ला पार केला.

तमिळनाडूने प्रथम फलंदाजी करताना ४५५ धावांचा डोंगर उभारला. इंद्रजीतने १४९ धावांची तर आंद्रे सिद्धार्थ सी याने १२१ धावांची उत्कृष्ट खेळी केली. तमिळनाडूने केलेल्या ४५५ धावांच्या प्रत्युत्तरात उत्तर प्रदेशने १४९ धावांत ३ विकेट्स गमावल्या होत्या. यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या रिंकू सिंहने संघाचा डाव सावरत शतकी खेळी केली. रिंकूने शतकी खेळीनंतर आता गियर बदलत वेगाने फलंदाजीला सुरूवात केली आहे.

चौथ्या दिवसाच्या खेळादरम्यान रिंकूने शतक पूर्ण केलं. १५७ चेंडूंत रिंकूने नऊ चौकार आणि तीन षटकारांसह शतकी खेळी केली. रिंकू पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. चौथ्या दिवसाच्या खेळाचे पहिले सत्र सुरू आहे. रिंकू १०३ धावांवर नाबाद आहे. रिंकू सिंहने भारताच्या टी-२० संघात तर आपलं स्थान मिळवलं आहे. पण प्रथम श्रेणी क्रिकेटमधील त्याची कामगिरी पाहता कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी त्याचा दावा ठोकला आहे.

रिंकूने शिवम मावी (५४) बरोबर सहाव्या विकेटसाठी १०४ धावांची भागीदारी केली. यामुळे उत्तर प्रदेशला पाच बाद १९१ धावांवरून २९५ धावांपर्यंत मजल मारता आली. मावीने ६२ चेंडूंत सात चौकार आणि एका षटकारासह ५४ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. दुसऱ्या टोकावरून विकेट्स पडत असताना रिंकू एका टोकाला पाय घट्ट रोवून उभा होता.

रिंकूने तमिळनाडूचा कर्णधार आर साई किशोरच्या चेंडूवर षटकार ठोकत अर्धशतक पूर्ण केलं. तत्पूर्वी, अभिषेक गोस्वामीने ७९ धावा, माधव कौशिकने २१, आर्यन जुयालने ४३ आणि कर्णधार करण शर्माने ११ धावा केल्या.