ऑलिम्पिक स्पर्धामध्ये भारतीयांची प्रगती संख्यात्मक वाढीच्या बाबतील उल्लेखनीय आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या रिओ ऑलिम्पिक स्पध्रेत सहभागी होणाऱ्या भारतीय पथकाने शंभरी पार केली.. इतिहासात पहिल्यांदा इतक्या मोठय़ा संख्येने भारतीय खेळाडू ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार आहेत. पण, प्रश्न हा आहे की यापैकी किती जण या संधीचे सोनं करतील. भारताला पदक मिळवून देणाऱ्या खेळांमध्ये आपण बॅडमिंटन, नेमबाजी, तिरंदाजी आणि बॉक्सिंग यांना प्रामुख्याने स्थान देण्यास हरकत नाही. या खेळातील प्रगती पाहता ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या खेळाडूंच्या संख्येतही लक्षणीय वाढ झालेली आहे. पण, या पदकांच्या प्रबळ दावेदारांमध्ये बॉक्सिंगची अवस्था ही चिंताजनक आहे. या अवस्थेला लाजिरवाणी म्हणून खेळाडूंच्या मेहनतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करायचे नाही. मात्र, बॉक्सिंगचे प्रशासकीय कामकाज हाकणाऱ्यांनी हेही दिवस दाखवायचे कमी केले नव्हते. शिवा थापा (५६ किलो), विकास कृष्णन (७५ किलो) आणि मनोज कुमार (६४ किलो) या तीन बॉक्सिंगपटूंनाच रिओवारी निश्चित करता आली आहे. हा आकडा  प्रशासकीय नाकर्तेपणाचा आरसा आहे. त्यांच्यातील मतभेदामुळे खेळाडूंमध्ये प्रचंड गोंधळाचे वातावरण होते आणि त्यामुळेच गेल्या ऑलिम्पिकच्या तुलनेत ही संख्या रोडावलेली आहे. पाच वेळा विश्वविजेतेपदाचा मान पटकावणारी महिला खेळाडू एम. सी. मेरी कोमला रिओ वारी पक्की करण्यात अपयश आले. या अपयशानंतर तिने तमाम भारतीयांची माफी मागितली. त्याचवेळी संघटनांमध्ये चाललेल्या वादांवर मार्मिक टीका करून तिने खेळाडूंच्या पीछेहाटीमागच्या कारणाला वाचा फोडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आठ वर्षांपूर्वी पार पडलेल्या बीजिंग ऑलिम्पिक स्पध्रेत विजेंदर सिंगने मिडलव्हेट गटात (७५ किलो) भारताला कांस्यपदक पटकावून दिले. भारताला बॉक्सिंगमध्ये मिळालेले हे पहिले पदक. त्यावेळी पाच जणांचा चमू बीजिंगमध्ये खेळला होता. त्यानंतर २०१२च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये ही संख्या पाचवरून आठवर गेली. या स्पध्रेत पहिल्यांदा महिला बॉक्सिंग प्रकार खेळविण्यात आला आणि त्यात मेरी कोमने सर्वस्व पणाला लावून भारताच्या खात्यात आणखी एक कांस्यपदक जमा करून दिले. या दोन्ही ऑलिम्पिकमधील बॉक्सर्सच्या कामगिरीने बहुतांश तरुण वर्गाला आपलेसे केले. बॉक्सिंगकडे वळणाऱ्या युवकांची संख्याही वाढली. पण, नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न.. तशी अवस्था बॉक्सिंगचीही झाली. संघटनात्मक वाद  इतका टोकाला गेला की आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेला (एआयबीए) याची दखल घ्यावी लागली. त्यावेळी अस्तित्वात असलेली संघटना बरखास्त करण्याचा निर्णय एआयबीएने घेतला. त्यानंतर बॉक्सिंग इंडिया नामक नवीन संघटना उदयास आली. एका वर्षांतच या नव्या संसारात भांडणे होऊ लागली आणि ज्यांनी पुढाकार घेऊन ही संघटना उभी केली त्यांनाच बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. त्यानंतर पुन्हा एआयबीएने नव्याने निवडणूक घेण्याचे फर्मान सोडले आणि रिओ ऑलिम्पिक तोंडावर आली असतानाही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. पळवाटा काढून भारतीय खेळाडूंना तिरंग्याखाली खेळण्याची परवानगी मिळवली, इतकेच समाधान. पण, त्यातही संभ्रमाचे वातावरण आहेच. या सर्व वादात देशात राष्ट्रीय स्पर्धाचे, सराव शिबिराचे आयोजन नाही आणि त्यामुळे खेळाडूंचे मानसिक खच्चीकरण झाले. त्यामुळेच गेल्या ऑलिम्पिकच्या तुलनेत रिओमध्ये सहभागी होणाऱ्या बॉक्सर्सची संख्या थेट पाचने कमी झाली.

ऑलिम्पिक पदक विजेता विजेंदर सिंगने व्यावसायिक बॉक्सिंगकडे मोर्चा वळवल्यानंतर भारताच्या ऑलिम्पिक चळवळीला तडा बसला. विजेंदरच्या या निर्णयामुळे त्याच्यावर टीका झाली, परंतु त्याला दोष देणे चुकीचे  आहे. लंडन ऑलिम्पिकचा अनुभव गाठीशी असलेला शिवा थापा रिओमध्ये पदकाचा प्रबळ दावेदार आहे. सर्वात तरुण खेळाडू म्हणून लंडनमध्ये दाखल झालेला हा खेळाडू गेल्या चार वर्षांत परिपक्व झाला आहे. खेळातील अनेक बारकावे त्याने सहजतेने शिकून घेतले आहे. रिओसाठी पात्र ठरणारा शिवा हा पहिला बॉक्सर्स ठरला. चीनमध्ये झालेल्या आशियाई ओशानिया ऑलिम्पिक पात्रता स्पध्रेत शिवाने बॅन्टमवेट गटात दुसरे स्थान पटकावून रिओवारी निश्चित केली. त्यापाठोपाठ विकास आणि मनोज यांनी मुसंडी मारली. एआयबीए विश्व ऑलिम्पिक पात्रता स्पध्रेत विकास व मनोजने उपांत्य फेरीत प्रवेश करून रिओत प्रवेश केला. या तिन्ही खेळाडूंना २०१२च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचा अनुभव आहे. मात्र, शिवाची सातत्यपूर्ण कामगिरी त्याला पदकाचा प्रबळ दावेदार बनवते.

अंतर्गत बंडाळ्या मागे सारून भारतीय बॉक्सिंग एका नव्या पारदर्शक पर्वासाठी सज्ज झाले आहे. धावण्याच्या शर्यतीपूर्वी ‘साडे माडे तीन’ असे म्हटले जाते. नव्या पर्वाच्या उंबरठय़ावर भारतीय बॉक्सिंगपटू क्रीडा विश्वातल्या सर्वोच्च सोहळ्यातही याच निर्णायक टप्प्यावर आहेत. त्यांच्या प्रयत्नांना पदकाचे कोंदण लाभल्यास तो अपूर्व योग ठरेल.

  • ५६ किलो- बॅन्टमवेट प्रकारशिवाने २००८ मध्ये आशियाई आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पध्रेतून कारकिर्दीला सुरुवात केली. रशियात झालेल्या या स्पध्रेत त्याने कांस्यपदक पटकावले.
  • त्यानंतर त्याने हैदर अलीयेव्ह चषक स्पध्रेत सुवर्णपदक जिंकले. सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर त्याने कनिष्ठ विश्व बॉक्सिंग अजिंक्यपद स्पध्रेसाठी निवडलेल्या भारतीय संघात स्थान पटकावले. त्या स्पध्रेत ५२ किलो वजनी गटात त्याने कांस्यपदक जिंकले.
  • युवा विश्व हौशी बॉक्सिंग अजिंक्यपद स्पध्रेत रौप्यपदक जिंकून त्याने युवा ऑलिम्पिक स्पध्रेची पात्रता मिळवली. मात्र, त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
  • युवा ऑलिम्पिक स्पध्रेत रौप्यपदकाची कमाई करणाऱ्या शिवाची २०१२ साली झालेल्या लंडन ऑलिम्पिक स्पध्रेसाठी निवड झाली. भारताकडून ऑलिम्पिकमध्ये खेळणारा तो युवा बॉक्सर ठरला. तत्पूर्वी, आशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पध्रेत त्याने विजय मिळवून ऑलिम्पिक वारी निश्चित केली. लंडनमध्ये त्याला पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला.

ऑलिम्पिकमधील भारताची कामगिरी

  • २००७ बीजिंग- विजेंदर सिंग (७५ किलो) कांस्यपदक
  • २०१२ लंडन – मेरी कोम (४८ किलो) कांस्यपदक

swadesh.ghanekar@expressindia.com

मराठीतील सर्व रिओ २०१६ ऑलिम्पिक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian boxer is ready for rio olympics
First published on: 24-07-2016 at 04:13 IST