ब्राझीलमधील भारतीय दूतावासाकडून सुधा सिंग, जैशा यांनाही निर्देश

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रिओ ऑलिम्पिकनंतर भारतात परतलेल्या व तापाची लक्षणे दिसणाऱ्या खेळाडूंची ब्राझीलमधील भारतीय दूतावासाच्या निर्देशानुसार वैद्यकीय तपासणी करण्यात येत असून, त्याअंतर्गत ‘सावरपाडा एक्स्प्रेस’ कविता राऊतची सोमवारी सायंकाळी येथील जिल्हा रुग्णालयात तपासणी करण्यात आली. ब्राझीलमध्ये ‘झिका’ या आजाराचे रुग्ण आढळून येत असल्याच्या पाश्र्वभूमीवर ही तपासणी करण्यात येत आहे.

ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या सुधा सिंग, ओ. पी. जैशा आणि कविता राऊत या तिघा धावपटूंना ताप जाणवत आहे. ऑलिम्पिकमधील मॅरेथॉनमध्ये सहभागी होऊन रविवारी भारतात परत आल्यापासून कविताला ताप व खोकला जाणवू लागला. दरम्यान, ब्राझीलमधील भारतीय दूतावासाकडून केंद्र सरकारकडे तापाची तक्रार असणाऱ्या खेळाडूंची वैद्यकीय तपासणी करण्याची सूचना करण्यात आली. त्यानुसार केंद्राकडून येथील जिल्हा रुग्णालयात निर्देश दिले.

जिल्हा रुग्णालयाकडून कविता राऊतला त्या संदर्भात कळवण्यात आल्यावर सायंकाळी ती रुग्णालयात तपासणीसाठी दाखल झाली. डॉक्टरांनी तिला खोकल्यावरील गोळ्या दिल्या. तिच्या रक्ताचे आणि लघवीचे नमुने घेण्यात आले असून ते पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक गजानन होले यांनी कविताला रुग्णालयातच थांबण्याचा सल्ला दिला.

तीन हजार मीटर स्टीपलचेसमध्ये भाग घेतलेली उत्तर प्रदेशची धावपटू सुधा सिंग शनिवारी भारतात परतल्यापासून तापामुळे आजारी आहे. बंगळुरू येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणमध्ये प्राथमिक उपचार घेतल्यानंतर तिची तब्येत पुन्हा बिघडल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

नाशिक जिल्हा रूग्णालयाकडून वैद्यकीय तपासणीचा निरोप मिळाल्यानंतर सोमवारी सायंकाळी वैद्यकीय तपासणी करून घेतली. डॉक्टरांनी खोकल्यावर गोळ्या दिल्या. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रूग्णालयातच थांबण्यास सांगितले. परंतु बरे वाटत असल्याने मी रूग्णालयात थांबण्यास नकार दिला. वैद्यकीय अधिकाऱ्यानी पुन्हा बोलावल्यावर किंवा बरे न वाटल्यास रूग्णालयात दाखल होईन.

– कविता राऊत, धावपटू

मराठीतील सर्व रिओ २०१६ ऑलिम्पिक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kavita raut medical checkup for zika precautions
First published on: 23-08-2016 at 04:08 IST