रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताची पदकाची आशा कायम ठेवलेली महिला बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधू आपल्या उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी पूर्णपणे सज्ज झाली आहे. डोळ्यासमोर एकच उद्देश ठेवून वर्षानुवर्षे केलेल्या खडतर सरावातूनच ऑलिम्पिकचे पदक जिंकण्याचे खेळाडूंचे स्वप्न पूर्ण होते. पण एखाद्या खेळाडूने जिंकलेल्या पदकामागे केवळ त्या खेळाडूचेच नाही, तर इतर जवळच्या व्यक्तींचेही मोलाचे योगदान असते. तशी अनेक उदाहरणे देखील आजवर समोर आली आहेत. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंकडून अपेक्षित कामगिरी होत नसताना पी.व्ही.सिंधूने मात्र आपल्यातील सर्वोत्तम खेळीचा नजराणा पेश करत स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. उपांत्यफेरीपर्यंतचा तिचा प्रवास देखील खडतर राहिल्याचे तिच्या सामन्यांतून स्पष्ट दिसून आले आहे. अर्थात सिंधूने त्यासाठी बॅडमिंटन कोर्टवर खूप घाम गाळला आहेच, पण पी.व्ही.सिंधूच्या या उल्लेखनीय कामगिरीत तिच्या वडिलांचाही सिंहाचा वाटा आहे.

पी.व्ही.सिंधूचे वडील पी.व्ही.रामन्ना आणि आई विजया रामन्ना सध्या रिओमध्ये जाऊन आपल्या मुलीचे सामने प्रत्यक्षात पाहू शकत नसले तरी तिच्या वडिलांनी पी.व्ही.सिंधू रिओसाठी रवाना होण्यापूर्वी तिच्या सरावासाठी तब्बल आठ महिन्यांची सुटी घेतली होती. ऑलिम्पिकसारख्या जागतिक स्पर्धेत खेळण्याचे पी.व्ही.सिंधूची ही पहिलीच वेळ असल्याने तिच्या आई-वडिलांनी तिला सरावादरम्यान पुरेपूर मदत केली. रेल्वेत काम करणारे पी.व्ही.सिंधूचे वडील दररोज पहाटे चार वाजता आपल्या मुलीला बॅडमिंटनच्या ट्रेनिंगसाठी गोपिचंद ट्रेनिंग अकादमीत सोडायला जात असत. पी.व्ही.सिंधूच्या सरावावर तिच्या वडिलांचे पूर्ण लक्ष असायचे. आपल्या मुलीला जास्तीत जास्त वेळ देता यावा यासाठी त्यांनी आठ महिन्यांची सुटी घेतली होती.