Rishabh Pant Visits Tirupati Balaji Video Viral: सध्या जगभरात एकदिवसीय विश्वचषक २०२३ स्पर्धेची चर्चा आहे. यंदाचा विश्वचषक भारतात खेळला जात असून भारतीय संघाकडून यावेळी विश्वचषकाचे जेतेपद पटकावण्यासाठी सर्वांनाच मोठ्या अपेक्षा आहेत. दरम्यान, संघाचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिरात पोहोचला. पंतने भारतीय संघाला २०२३ च्या विश्वचषक विजेतेपदासाठी प्रार्थना केली. यावेळी त्याच्यासोबत त्याचा अन्य सहकारी अक्षर पटेलही मंदिरात दर्शनासाठी आला होता. दोघांचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.

अपघातानंतर ऋषभ पंत बराच काळ टीम इंडियातून आहे बाहेर –

गेल्या वर्षी ३० डिसेंबरला ऋषभ पंतच्या कारला दिल्लीहून त्याच्या मूळ गावी रुरकीला जात असताना अपघात झाला होता. या अपघातात पंत यांची कार पूर्णपणे जळून खाक झाली होती. त्याचबरोबर त्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर तो अनेक महिने रुग्णालयात होता. तेव्हापासून ऋषभ पंत टीम इंडियातून बाहेर आहे, पण आता तो बऱ्यापैकी रिकव्हर झाला आहे आणि लवकरच त्याचे टीममध्ये पुनरागमन होऊ शकते. मात्र, पंत कधी आणि कोणत्या मालिकेत टीम इंडियात परतणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

ऋषभ पंतची वनडे आणि कसोटीतील आतापर्यंतची कामगिरी –

ऋषभ पंतने भारतीय संघासाठी ३० एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यात त्याने २६ डावात ८६५ धावा केल्या आहेत. या कालावधीत पंतने एक शतक आणि ५ अर्धशतके झळकावली आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये पंतची सर्वोच्च धावसंख्या १२५ धावा आहे. याशिवाय पंतने कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियासाठी अनेक महत्त्वपूर्ण खेळी खेळल्या आहेत. पंतने टीम इंडियासाठी ३३ सामन्यांच्या ५६ डावांमध्ये २२७१ धावा केल्या आहेत. या काळात त्याने आपल्या बॅटने ५ शतके आणि ११ अर्धशतके झळकावली आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये पंतची सर्वोत्तम धावसंख्या १५९ धावा आहे.

हेही वाचा – World Cup 2023: उपांत्य फेरीच्या शर्यतीत पिछाडीवर पडलेल्या किवी संघाला मोठा धक्का, ‘हा’ वेगवान गोलंदाज विश्वचषकातून झाला बाहेर

भारताने विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर गुरुवारी (२ नोव्हेंबर) श्रीलंकेवर ३०२ धावांनी विजय मिळवला. टीम इंडिया उपांत्य फेरीत पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. त्याने विश्वचषकाच्या इतिहासातील धावांच्या बाबतीत सर्वात मोठा विजय मिळवला. यापूर्वी २००७ मध्ये बर्म्युडाचा २५७ धावांनी पराभव केला होता. भारताचा पुढील सामना आता रविवारी (५ नोव्हेंबर) दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे.