Jofra Archer Dimiss Rishabh Pant by Cracker Video: भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यात ऋषभ पंतने दुखापत असतानाही जिद्दीने शानदार अर्धशतक झळकावलं आणि भारताच्या धावसंख्येत महत्त्वपूर्ण योगदान दिलं. दुखापतीमुळे चालताना त्याला त्रास होत होता, तरीही फ्रॅक्चर असूनही तो दुसऱ्या दिवशी संघासाठी फलंदाजीस उतरला. अर्धशतक करत असलेल्या पंतला बाद करण्यासाठी आर्चरने एक कमालीचा चेंडू टाकला आणि त्याला त्रिफळाचीत केलं.
ऋषभ पंत ४८ चेंडूत ३७ धावांवर खेळत असताना रिटायर्ड होत बाहेर गेला होता. ऋषभ पंत दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर उशिरा मैदानावर पोहोचला आणि त्यानंतर बीसीसीआयने तो गरज भासल्यास फलंदाजीला उतरेल अशी माहिती दिली. तितक्यात लंचब्रेकच्या आधी दुसऱ्या दिवशी शार्दुल ठाकूर बाद झाल्यानंतर ऋषभ पंत फलंदाजीला उतरला.
ऋषभ पंत सावधपणे फलंदाजी करत होता, पण संधी मिळताच त्याने आक्रमक फटकेही खेळले. बाद होण्यापूर्वीच्या आर्चरच्या षटकात पंतने त्याच्या गोलंदाजीवर दणदणीत षटकार खेचला होता. तर स्टोक्सच्या गोलंदाजीवरही त्याने चौकार लगावले होते.
अर्धशतक झाल्यानंतर आर्चर पुन्हा गोलंदाजीला आला आणि त्याने षटकातील तिसऱ्या चेंडूवर त्रिफळाचीत केलं. आर्चरने टाकलेला चेंडू पंत खेळायला चुकला आणि जाऊन ऑफ स्टम्पवर आदळला. ऑफ स्टम्पवर चेंडू आदळल्यानंतर कोलांट्या उड्या घेत हवेत उडाला आणि काही अंतरावर जाऊन आपोआप मैदानात रूतला. जिद्दी ऋषभ पंतला बाद करण्यासाठी आर्चरने जादुई चेंडू टाकत मोठी विकेट मिळवली. पंतच्या विकेटचा व्हीडिओ व्हायरल होत असला तरी त्याच्या जिद्दीचं मात्र कौतुक केलं जात आहे.
भारतीय संघ मँचेस्टर कसोटीत पहिल्या डावात ३५८ धावा करत सर्वबाद झाला. भारताच्या जवळपास सर्वच खेळाडूंनी धावांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलं. यशस्वी जैस्वाल (५८), साई सुदर्शन (६१), ऋषभ पंत (५४) यांनी शानदार अर्धशतकं झळकावली. तर केएल राहुलने ४६ आणि शार्दुल ठाकूरने ४१ धावा केल्या आणि त्यांची अर्धशतकं थोडक्यात हुकली. याशिवाय जडेजाने २० धावा तर सुंदरने २७ धावांचं योगदान दिलं. इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्सने ८ वर्षांनंतर कसोटीमध्ये ५ विकेट्स घेतल्या. त्याच्याशिवाय जोफ्रा आर्चरने ३ विकेट्स घेतल्या.