Rishabh Pant Ben Duckett Exchange Viral Video: भारतीय संघ लॉर्ड्स कसोटीतील पहिल्या डावात चांगली फलंदाजी करत आहे. ऋषभ पंत आणि केएल राहुलच्या भागीदारीच्या जोरावर भारताने तिसऱ्या दिवशी चांगली धावसंख्या उभारली आहे. केएल राहुलने शतक झळकावत चांगली कामगिरी केली. यादरम्यान ऋषभ पंत आणि बेन डकेट यांच्यातील बोलणं स्टम्प माईकमध्ये रेकॉर्ड झालं, ज्यामध्ये ऋषभ पंतने कमालीचं उत्तर दिलं आहे. ज्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील लॉर्ड्स कसोटीच्या तिसऱ्या दिवशी फक्त फटकेबाजी नव्हे तर सकाळच्या सत्रात शाब्दिक बाचाबाची देखील पाहायला मिळाली. जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर चौकारांनी दणदणीत सुरूवात केल्यानंतर ऋषभ पंत आणि केएल राहुल यांनी संयमी खेळी केली. भारताचा रनरेट घसरल्याचं कळताच इंग्लंडच्या बेन डकेटने पंतला स्लेजिंग करून त्याचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला.
दुसऱ्या दिवशी ३ विकेट्स गमावल्यानंतर पंत-राहुल डाव सावरत होते. तितक्यात डकेटने पंतला डिवचण्याचा प्रयत्न केला आणि त्याला विचारलं, “काय ड्रॉ करण्यासाठी खेळताय का असं?” न उत्तर देता शांत राहिल तो ऋषभ पंत कसला? ऋषभ पंतने त्याला चांगलंच उत्तर दिलं आणि त्याची बोलती बंद केली.
पंतने क्षणाचा विलंब न करता हसत हसत त्याला स्पष्ट उत्तर देत होता,
पंत: “कोण? मी?”
डकेट: “हो.”
पंत: “हो अगदी तुझ्यासारखं ना?”
डकेट: “हो माझ्यासारखं. असंच मी पहिल्या डावात फलंदाजी करत होतं.”
पंत यानंतर मिश्किल हसू लागला आणि डकेटला त्याला स्लेज करून चूक केल्यासारखं वाटलं असेल. कारण डकेट पंतचं लक्ष विचलित करण्यासाठी त्याला स्लेज करायला गेला आणि स्वत:ची लाज काढून घेतली. याचा व्हीडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
पंतचं हे प्रत्युत्तर इंग्लंडच्या पहिल्या दिवशीच्या संथ आणि सावध सुरुवातीची थेट आठवण करून देणारं होतं. तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी बॅझबॉल म्हणजेच आक्रमक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या इंग्लंडने फार संथ सुरूवात केली होती. ज्यामध्ये डकेट आणि जॅक क्रॉली पहिल्या १३ षटकांत फक्त ३९ धावा करू शकले होते. ज्यामध्ये भारतीय संघाने त्यांची चांगलीच खिल्ली उडवली होती.
ऋषभ पंतच्या या विनोदबुद्धीने दिलेल्या उत्तराने इंग्लंड आणि बेन डकेटच्या माईंड गेम्सला चकित केलं. माईंड गेम्स खेळू पाहणाऱ्या इंग्लंड संघाचा डाव पंतने हाणून पाडला होता. ऋषभ पंत ११२ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारांसह ७४ धावा करत धावबाद झाला.