बंगळूरु : दुखापतीमुळे घ्याव्या लागलेल्या तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर ऋषभ पंतचे क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन होणार असून हेच आज, गुरुवारपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघांत सुरू होणाऱ्या पहिल्या अनौपचारिक कसोटी सामन्याचे मुख्य आकर्षण राहणार आहे.
इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात (२३ जुलैला) पंतच्या पायाला दुखापत झाली. त्यानंतर ‘अ’ संघांतील दोन सामन्यांच्या मालिकेतून पंत थेट कर्णधार म्हणून पुनरागमन करणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या आगामी कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी तंदुरुस्ती आणि लय दाखवण्याची पंतला ही सर्वोत्तम संधी असेल.
फलंदाजीबरोबरच त्याचा यष्टींमागे सरस कामगिरी करण्याचा प्रयत्न असेल. ‘अ’ संघात सारांश जैन, मानव सुथार, हर्ष दुबे आणि तनुष कोटियन असे गुणवान फिरकीपटू असून त्यांच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षण करताना पंतच्या हालचाली आणि लवचीकता यावर निवड समितीचे लक्ष असेल.
कसोटी संघात सध्या तिसऱ्या क्रमांकावर खेळणाऱ्या साई सुदर्शनला अद्याप मोठी खेळी करता आलेली नाही. ‘अ’ संघाच्या सामन्यातून चांगली फलंदाजी दाखवून संघातील आपले स्थान भक्कम करण्याची संधी सुदर्शनला मिळेल. खलील अहमद, अंशुल कंबोज, देवदत्त पडिक्कल, नारायण जगदीशन हे युवा खेळाडूही वरिष्ठ संघात स्थान मिळवण्याच्या शर्यतीत कायम राहण्याचा प्रयत्न करतील.
दोन वर्षांनी कसोटी संघात स्थान मिळालेल्या झुबेर हमझा याच्या फलंदाजीकडे दक्षिण आफ्रिका संघ व्यवस्थापनाची नजर असेल. गेल्या सहा प्रथमश्रेणी सामन्यांत त्याने दोन शतके आणि दोन अर्धशतके झळकावली आहेत.
