यष्टीरक्षक ऋषभ पंतचा फलंदाजीतला ढासळलेला फॉर्म हा सध्या भारतीय संघासाठी चिंतेचा विषय ठरला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या टी-२० सामन्यातही ऋषभ पंतला अपेक्षेप्रमाणे खेळ करता आला नाही. एकीकडे सोशल मीडियावर पंतला संघाबाहेर करण्यासाठी दबाव वाढत असताना, भारताचा माजी क्रिकेटपटू लक्ष्मणने ऋषभ पंतला फलंदाजीत चौथ्या क्रमांकाऐवजी पाचव्या क्रमांकावर पाठवण्याचा पर्याय सुचवला आहे.

“आताच्या घडीला ऋषभने पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येणं गरजेचं आहे. त्या जागेवर फलंदाजीसाठी येताना तुमच्याकडून आक्रमक फटकेबाजीची अपेक्षा केली जाते. चौथ्या क्रमांकावर योग्य पद्धतीने फलंदाजी कशी केली जाते हे ऋषभला माहितीच नाहीये.” सामना संपल्यानंतर Star Sports वाहिनीवर विश्लेषणादरम्यान लक्ष्मणने आपलं मत मांडलं.

“प्रत्येक खेळाडू त्याच्या कारकिर्दीत अशा खडतर प्रसंगांमधून जातो. आक्रमक खेळ ही त्याची नैसर्गिक शैली आहे, आयपीएलमध्ये तो तशीच फलंदाजी करतो. मात्र सध्या वन-डे क्रिकेटमध्ये त्याचं सगळंच बिनसलंय. तो चुकीच्या पद्धतीने फटके खेळत आहे. त्यामुळे श्रेयस अय्यर किंवा हार्दिक पांड्या यांच्यापैकी एकाला चौथ्या क्रमांकावर संधी देऊन पंतला मधल्या फळीत फलंदाजीची संधी द्यायला हवी.” पंतच्या शैलीबद्दल लक्ष्मण बोलत होता.