भारतीय संघाचा क्रिकेटपटू ऋषभ पंत हा चौकार-षटकारांची आतषबाजी करणारा फलंदाज म्हणून ओळखला जातो. झटपट क्रिकेटमध्ये पंतला खूप महत्त्व आहे. आज पुण्यात इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने 77 धावांची दमदार खेळी केली. या खेळीसह त्याने भारताचे माजी क्रिकेटपटू युवराज सिंह आणि महेंद्रसिंह धोनी यांचा जुना विक्रम मोडित काढला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऋषभ पंतने इंग्लंडविरुद्धच्या एकाच डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा खास विक्रम नोंदवला आहे. इंग्लंडविरुद्ध अशी कामगिरी करणारा तो जगातील एकमेव यष्टीरक्षक बनला आहे. इंग्लंडविरुद्धच्या दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने 336 धावा केल्या. यात पंतने 40 चेंडूत 3 चौकार आणि 7 षटकारांसह 77 धावांची खेळी केली.

इंग्लंडविरुद्ध षटकारांचा विक्रम

इंग्लंडविरुद्धच्या एका डावात सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज म्हणून पंतची ओळख तयार झाली आहे. यापूर्वी युवराज सिंग आणि महेंद्रसिंह धोनी यांनी इंग्लंडविरुद्धच्या डावात संयुक्तपणे सर्वाधिक षटकारांची नोंद केली होती. या दोघांनी इंग्लंडविरुद्धच्या डावात 6-6 षटकार लगावले होते. पंतने या दोघांनाही मागे टाकले आहे. सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांनी इंग्लंडविरुद्धच्या डावात 5-5 षटकार लगावले आहेत.

यष्टीरक्षक म्हणूनही पंतचा पराक्रम

इंग्लंडविरुद्धच्या डावात सर्वाधिक षटकार ठोकणारा यष्टीरक्षक म्हणूनही पंतच्या नावावर विक्रम झाला आहे. यापूर्वी न्यूझीलंडचा माजी अनुभवी यष्टीरक्षक ब्रॅंडन मॅक्युलम, दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डी कॉक आणि माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंह धोनीने एका डावात प्रत्येकी 6 षटकार लगावले होते. पंतने आज 7 षटकार मारत हा विक्रम आपल्या नावावर केला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rishabh pant smashes seven sixes against england and breaks record adn
First published on: 26-03-2021 at 19:22 IST