Rishabh Pant Wicket Goes Viral IND vs ENG: ऋषभ पंत आपल्या आगळ्यावेगळ्या आणि अनोख्या फटकेबाजीसाठी ओळखला जातो. कधी जमिनीवर पडून फटके, कधी बॅट उडवून पंत मोठमोठे फटके खेळतो. पण पंत आऊटदेखील अशा विचित्र पद्धतीनेच होतो. दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या डावातही ऋषभ पंत झेलबाद झाला आहे. शोएब बशीरच्या चेंडूवर मोठा फटका खेळत ऋषभ पंत बाद होऊन बाहेर गेला. ज्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे आणि त्यावर चाहत्यांनीही भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

केएल राहुल बाद झाल्यानंतर ऋषभ पंत फलंदाजीला आला आणि त्याने वादळी फटकेबाजी करत खोऱ्याने धावा करायला सुरूवात केली. ऋषभ पंतने पहिल्या सत्रात फलंदाजी उतरताच लंचपर्यंत ३५ चेंडूत २ षटकार आणि ५ चौकारांसह नाबाद ४१ धावांची खेळी केली आहे. पंतच्या वनडे स्टाईल खेळीमुळे भारताने वेगाने धावा केल्या. पंतने मैदानावर अनेक भन्नाट फटके खेळले.

ऋषभने या खेळीदरम्यान त्याचा आयकॉनिक मैदानावर पडत फटकाही खेळला. शोएब बशीरच्या ४७व्या षटकात पहिल्याच चेंडूवर त्याने चौकार लगावला. यानंतर पुढच्याच चेंडूवर तो मोठा फटका खेळायला गेला आणि त्याच्या हातून बॅट निसटली. पंतचा फटका समोरच्या दिशेने हवेत उंच उडाला तर त्याच्या डाव्या बाजूला बॅट हवेत उंच उडाली.

पंतच्या हातातून बॅट निसटल्याने फटका तो नीट खेळू शकला नाही आणि त्यामुळे बेन डकेटने सीमारेषेजवळ त्याचा झेल टिपला. तर ब्रायडन कार्सने त्याला त्याची बॅट उचलून दिली. ऋषभ पंत पुन्हा एकदा नको तो फटका खेळत झेलबाद झाला. पंतने ५८ चेंडूत ३ षटकार आणि ८ चौकारांसह ६५ धावांची वादळी खेळी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शुबमन गिलने ऋषभ पंतसह चौथ्या विकेटसाठी १०३ चेंडूत ११० धावांची भागीदारी केली आहे. ऋषभ पंत बाद झाल्यानंतर शुबमन गिलने शानदार शतक झळकावलं आहे. गिलने त्याचं शतक झळकावत अनेक विक्रम आपल्या नावे केले आहे. यासह टीब्रेकपर्यंत भारताची आघाडी ४८४ पर्यंत पोहोचली आहे.