आधी वाजत गाजत परदेशी प्रशिक्षक आणायचे आणि त्यांच्याकडून हवा तसा निकाल नाही मिळाला तर त्यांची तडकाफडकी हकालपट्टी करायची. हा निकाल केवळ मैदानापुरताच नाही, तर संघटनांमधील अधिकाऱ्यांसोबतच्या संबंधांवरही अवलंबून आहे. मग तो खेळ कोणताही असो, भारतात हे असेच घडते. याबाबतची ताजी घटना सांगायची तर हॉकी प्रशिक्षक रोलँट ओल्टमन्स यांची हकालपट्टी. त्यांच्या करारात वाढ होणार नाही, याची कल्पनाच कुणी केली नव्हती. नवनवे प्रयोग करून भारतीय पुरुष हॉकी संघामध्ये जिंकण्याची ऊर्जा निर्माण करणारा स्रोतच हॉकी इंडियाने काढून घेतला.

मायकेल नॉब्स, टेरी वॉल्श आणि पॉल व्हॅन अ‍ॅस यांना हॉकी इंडियाकडून जशी वागणूक मिळाली, तशी ओल्टमन्स यांना मिळाली नाही, यावरच समाधान मानावे लागेल. पण ओल्टमन्सच्या जाण्याने पुरुष हॉकी संघाला पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागणार आहे. अनुभवी आणि युवा खेळाडूंची सांगड घालताना ओल्टमन्स यांनी केवळ संघाला मजबूत केले नाही, तर प्रभावी राखीव खेळाडूंची फळीही तयार केली होती. त्यामुळेच ओल्टमन्स यांच्या हकालपट्टीच्या वृत्तानंतर नेटिझन्सने हॉकी इंडियाच्या निर्णयावर चौफेर टीका केली. ओल्टमन्स यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने किती पदके जिंकली, किती चषक उंचावले? यापेक्षा अधिक त्यांच्या रणनीतीनंतर भारतीय खेळाडूंमध्ये झालेला आमूलाग्र बदल, शारीरिक तंदुरुस्तीमध्ये झालेली सुधारणा, खेळाडूंमध्ये नव्याने निर्माण झालेला आत्मविश्वास आणि महत्त्वाचे म्हणजे हॉकीकडून क्रीडारसिकांच्या वाढलेल्या अपेक्षा, या सर्व गोष्टी दुर्लक्ष करण्यासारख्या नक्कीच नव्हत्या. सामान्य हॉकीप्रेमींना ते कळले, परंतु अहंकारी संघटकांना याची जाण राहिली नाही. नुकत्याच झालेल्या दौऱ्यांतील निकालावरून या मंडळींनी ओल्टमन्स यांना जाण्यास भाग पाडले. या निर्णयानंतर ओल्टमन्स यांची प्रतिक्रिया फार बोलकी आणि हॉकी इंडियाची वृत्ती स्पष्ट करणारी आहे.

‘‘भारतात विशेषत: क्रीडा क्षेत्रात काम करणे आम्हा परदेशी प्रशिक्षकांना कधीच सोपे गेले नाही. त्यामुळे अशा दिवसासाठी मानसिक तयारी केली होती. ही जबाबदारी स्वीकारली त्याच वेळी एके दिवशी आपली हकालपट्टी होईल, याची जाण होती. म्हणूनच आजच्या दिवसासाठी तयार होतो!’’ असे ओल्टमन्स म्हणाले होते. भारतातील क्रीडाक्षेत्राची इतकी वाईट प्रतिमा यापूर्वी कधीच झाली नव्हती. मुख्य म्हणजे हॉकी इंडियाने आत्तापर्यंत २३ प्रशिक्षकांची अशीच हकालपट्टी केली आणि त्यातील चार प्रशिक्षकांना चार वर्षांत नारळ देण्याचा पराक्रम हॉकी इंडियाने करून दाखवला. ओल्टमन्स हे उच्च कामगिरी संचालक असतानाच हॉकी इंडियाने तीन परदेशी प्रशिक्षकांची घरवापसी केली. ओल्टमन्सचे भाग्य इतकेच की त्यांना सर्वाधिक काळ पुरुष हॉकी संघाशी जुळवता आले. जानेवारी २०१३मध्ये त्यांनी उच्च कामगिरी संचालकाची जबाबदारी स्वीकारली आणि ऑगस्ट २०१५मध्ये ते प्रशिक्षक झाले. रिओ ऑलिम्पिक स्पर्धेला बरोबर एक वर्ष असताना ओल्टमन्स यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली. नेदरलँड्सच्या महिला आणि पुरुष हॉकी संघाने विश्वविजेतेपद पटकावले ते ओल्टमन्स यांच्या मार्गदर्शनाखालीच. पण एका वर्षांत भारतासाठी ते अशी जादू करतील अशी अपेक्षा करणे चुकीचे होते. मात्र २०१२च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये तळाला असलेल्या भारतीय संघाने रिओत आपला दबदबा कमीअधिक प्रमाणात दाखवला. सातत्यपूर्ण खेळ करण्यात अपयश आल्याने त्यांना फार मोठी मजल मारता आली नाही, इतकेच.

२०१५ ते २०१७ या कालावधीत त्यांनी भारतीय संघामध्ये प्रथम सकारात्मक ऊर्जा निर्माण केली. जगातील इतर संघांच्या खेळाचा स्तर आणि भारताचे यामधील चित्र त्यांनी खेळाडूंना नीट समजावून सांगितले. केवळ अनुभवी म्हणून संघात वर्षांनुवर्षे चिटकून राहिलेल्या खेळाडूंसमोर युवा व उदयोन्मुख खेळाडूंचे आव्हान उभे केले आणि त्यामुळेच संघ निवडीसाठीही जबरदस्त संघर्ष पाहायला मिळाला. याचे श्रेय ओल्टमन्स यांना द्यावेच लागेल. हॉकी इंडियाच्या तीन दिवस चाललेल्या बैठकीत यावर चर्चा झाली, परंतु राखीव खेळाडूंची फौज असताना हवा तसा निकाल मिळत नसल्याने त्यांनी ओल्टमन्सना जाण्यास सांगितले. चमत्कार हा त्वरित घडत नसतो, त्याला वेळ द्यावा लागतो. ही साधी गोष्ट हॉकी इंडियाला गेली अनेक वर्षे कळलीच नाही. ओल्टमन्स यांनी त्या बैठकीत भारतीय पुरुष हॉकीच्या वाटचाली संदर्भातील सादरीकरणाचे निकालात रूपांतर होण्यासाठी बराच वेळ लागला असता, हे खरे आहे. मात्र तात्पुरत्या मलमपट्टीपेक्षा, कायमस्वरूपी इलाज केव्हाही चांगला.

ओल्टमन्स यांचा हाच प्रामाणिक प्रयत्न हॉकी इंडियाला नको होता. त्यांना झटपट निकाल हवा होता. नॉब्स, वॉल्श, अ‍ॅस आणि आता ओल्टमन्स ही मागील ४-५ वर्षांतील प्रशिक्षकांची यादी अशीच पुढे वाढत राहणार आहे. भारतीय महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक शोर्ड मरिन यांच्याकडे ओल्टमन्स यांच्या जागी प्रशिक्षकाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. २०१८ची विश्वचषक आणि २०२०ची ऑलिम्पिक स्पर्धा ही प्रमुख आव्हाने मरिन यांच्यासमोर आहेत. तत्पूर्वी, त्यांची पहिली कसोटी डिसेंबरमध्ये होणाऱ्या जागतिक हॉकी लीगमध्येच (अंतिम टप्पा) पाहायला मिळेल. हवा तो ‘निकाल’ देण्यात ते अपयशी ठरले, तर तुम्ही पण रांगेत आहात.. याची जाण त्यांना नक्की करून देण्यात येईल!

स्वदेश घाणेकर swadesh.ghanekar@expressindia.com