गवताच्या कोर्टवर आजही आपले अधिराज्य गाजवणारा टेनिसचा बादशाह रॉजर फेडरर याने स्वत:च्या पुनरागमनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दीर्घकाळाच्या विश्रामानंतर जूनमध्ये जर्मनीत होणाऱ्या स्टुगार्ट ओपन स्पर्धेतून तो पुनरागमन करणार आहे. गेल्या वर्षीही अशाच पद्धतीने फ्रेंच ओपन स्पर्धा संपल्यावर फेडररने स्टुगार्ट ओपनमधून पुनरागमन केले होते.

जून महिन्यात जर्मनीत होणाऱ्या स्टुगार्ट ओपनमधून मी पुनरागमन करत असल्याची घोषणा करताना मला फार आनंद होत आहे. ही स्पर्धा गवताच्या कोर्टवर खेळवली जाते. साहजिकच मला या स्पर्धेकडून खूप अपेक्षा आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून मला सकारात्मक सुरूवात करता येईल. त्यामुळे दीर्घ विश्रामानंतर या स्पर्धेत खेळण्यासाठी मी उत्सुक आहे, असे फेडररने म्हटले आहे.

१० जूनला फ्रेंच ओपनच्या पुरूष गटातील अंतिम लढती रंगणार आहेत. त्यानंतर लगेचच ११ जूनपासून स्टुगार्ट ओपन स्पर्धा सुरू होणार आहे. गेल्या वर्षी फेडररला या स्पर्धेत सलामीच्याच सामन्यात अनुभवी टॉमी हासकडून धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र, त्यानंतर हॅले ओपनचे नववे विजेतेपद आणि प्रतिष्ठेच्या विम्बल्डन स्पर्धेचे आठवे विजेतेपद पटकावून फेडररने उल्लेखनीय कामगिरी केली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या वर्षी स्टुगार्ट ओपनमध्ये गतविजेता लुकास पॉली, कॅनडाचा मिलॉस रावनिक, नेक्स्ट जेन एटीपी फायनल्स स्पर्धेचा विजेता ह्यून चुंग आणि ऑस्ट्रेलियाचा निक कार्गिऑस यांचे तगडे आव्हान फेडररपुढे असणार आहे. त्यामुळे या वेळी फेडररच्या पुनरागमनाची चाहत्यांना विशेष प्रतिक्षा आहे.

दरम्यान, सध्या फेडरर जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असून राफेल नडाल अव्वलस्थानी विराजमान आहे. मात्र, पुढील ६ आठवड्यांत नडालची कामगिरी असमाधानकारक झाल्यास पुनरागमन करताना फेडरर अव्वलस्थानी असण्याची शक्यता नाकारता येत नाही.