अहमदाबाद : आम्ही ज्याचे स्वप्न पाहिले होते, ते आता आमच्यासमोर आहे. खेळाडू म्हणून हा आमच्या कारकीर्दीतील सर्वात मोठा क्षण आहे. तुम्हाला विश्वचषकाचा अंतिम सामना खेळण्याची दररोज संधी मिळत नाही. एकदिवसीय विश्वचषक पाहातच मी लहानाचा मोठा झालो आहे. त्यामुळे मी या सामन्यासाठी खूप उत्सुक आहे, असे प्रतिपादन भारताचा कर्णधार रोहित शर्माने एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्याच्या पूर्वसंध्येला केले.
भारतीय संघ यंदाच्या स्पर्धेत अपराजित आहे. तर ऑस्ट्रेलियाच्या संघानेही पहिले दोन सामने गमावल्यानंतर सलग आठ सामने (एक उपांत्य फेरीचा सामना) जिंकले आहेत. त्यामुळे हा सामना चुरशीचा होईल असे रोहितला वाटते. ‘‘दोन्ही संघ दर्जेदार कामगिरी करून अंतिम फेरीत पोहोचले आहेत. ऑस्ट्रेलियाचा संघ परिपूर्ण आहे. मात्र, आम्ही केवळ आमची कामगिरी आणि योजनांवर लक्ष केंद्रित करू,’’ असे रोहित म्हणाला.तसेच भारताच्या यशाचे श्रेय प्रामुख्याने गोलंदाजांना जाते असेही रोहितने नमूद केले. त्याने प्रशिक्षक राहुल द्रविडची भूमिकाही अत्यंत महत्त्वाची असल्याचे म्हटले.
हेही वाचा >>>IND vs AUS Final: फायनल सामना बरोबरीत राहिल्यानंतर कसा निवडला जाणार विजेता? जाणून घ्या आयसीसीचे नवीन नियम
भारताला दोन दशकांपूर्वी म्हणजेच २००३मध्ये झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला होता. या पराभवाचा वचपा काढण्याची आता भारतीय संघाला संधी मिळाली आहे का, असे विचारले असता रोहित म्हणाला, ‘‘भूतकाळाचा विचार करणे मला आवडत नाही. मी केवळ वास्तवाचा विचार करतो. या सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करण्याचा आम्ही प्रयत्न करू. अन्य कसलाही आम्ही विचार करणार नाही.’’