Rohit Sharma Reaction India vs South Africa Women’s World Cup 2025: भारतीय महिला संघाने २०२५च्या महिला वनड विश्वचषकाचं जेतेपद आपल्या नावे केलं आहे. भारतीय संघाचा हा अंतिम सामना पाहण्यासाठी भारतीय क्रिकेटमधील अनेक दिग्गज उपस्थित होते. यादरम्यान रोहित शर्मादेखील भारतीय संघाचा अंतिम सामना पाहण्यासाठी आला होता. भारतीय संघाने जेतेपद पटकावताच रोहित शर्मा भावुक झाला आणि त्याची प्रतिक्रिया सध्या व्हायरल होत आहे.
नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर महिला वनडे विश्वचषक २०२५ चा अंतिम सामना खेळवला गेला. या सामन्यात शफाली वर्मा व स्मृती मानधना यांच्या १०४ धावांच्या भागीदारीच्या जोरावर भारताने २९८ धावा केल्या. यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ २४६ धावांवर सर्वबाद झाला आणि भारताने ५५ धावांनी सामना जिंकत विश्वविजेतेपद आपल्या नावे केलं. दीप्ती शर्माने या सामन्यात ५ विकेट्स घेतल्या.
भारतासाठी एकदिवसीय विश्वचषक जेतेपद जिंकणं हे रोहित शर्माचं मोठं स्वप्न आहे. आज भारतीय महिला संघाचा हा महिला विश्वचषक जेतेपदाचा अंतिम सामना पाहण्यासाठी रोहित शर्माने खास हजेरी लावली होती. हरमनप्रीत कौरने झेल टिपताच भारतीय संघ वर्ल्ड चॅम्पियन होताच रोहित शर्माने सर्वांसह उभं राहत टाळ्या वाजवल्या. यादरम्यान रोहितच्या डोळ्यात आनंद होता आणि सर्वांप्रमाणेच भावुक झाला होता.
कर्णधार हरमनप्रीत कौरसाठी हा विजय खास आहे, जी यापूर्वी १२ आयसीसी स्पर्धांमध्ये खेळली आहे आणि प्रत्येक स्पर्धेत तिला अपयश आलं. तिने २००९, २०१३, २०१७ आणि २०२२ मध्ये एकदिवसीय विश्वचषक खेळला होता. २००९, २०१०, २०१२, २०१४, २०१६, २०१८, २०२० आणि २०२३ मध्ये त्यांना टी-२० विश्वचषकासाठी पात्रता मिळवता आली नाही. आता, तिच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाने अखेर विश्वविजेते होण्याचा मान मिळाला आहे.
