IND vs ENG Rohit Sharma Angry Video: इंग्लंडविरूद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात हिटमॅनचा जलवा पाहायला मिळाला. भारताचा कर्णधार रोहित शर्माने रविवारी, ९ फेब्रुवारीला इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात शानदार शतकासह आपला फॉर्म परत मिळवला. त्याच्या खेळीने टीम इंडियाला महत्त्वपूर्ण विजय मिळवून दिला आणि चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या आधी त्याच्या फॉर्मवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या सर्वांची त्याने बोलती बंद केली. रोहितच्या या शतकी खेळीदरम्यान त्याने डीजे बंद कर सांगत शिव्या हासडताना दिसला.

रोहित शर्मा आणि शुबमन गिलने भारताच्या डावाची चांगली सुरूवात करून दिली. रोहितने चौकार-षटकारांच्या आतिषबाजीसह आपल्या शतकी खेळीची सुरूवात केली. तर गिलने देखील त्याला चांगली साथ दिली. पण सामना सुरू असताना सातव्या षटकात अचानक खेळ थांबला आणि दोन्ही संघाचे खेळाडू मैदानाबाहेर गेले होते.

भारतीय संघाच्या डावात फ्लडलाईट्समुळे दोन वेळा सामना थांबला. सातवे षटक सुरू होण्यापूर्वी फ्लडलाईट बंद पडली आणि सामना थांबला त्यानंतर काही मिनिटात लाईट पुन्हा सुरू झाली तेव्हा गिलने एक धाव घेत रोहितला स्ट्राईक दिली. रोहित फलंदाजीसाठी सज्ज होत असताना एका फ्लडलाईटचा संपूर्ण स्तंभच बंद पडला आणि बराच वेळ वाट पाहिल्यानंतर रोहित शर्मासह सर्व खेळाडू मैदानाबाहेर गेले. मोठ्या प्रतिक्षेनंतर सामना पुन्हा सुरू झाला. सामना थांबलेला असताना डीजेवर एकापेक्षा एक गाणी सुरू होती.

फ्लडलाईट सुरू झाल्यानंतर सर्व खेळाडू मैदानावर आले. रोहित शर्मानेही स्ट्राईक घेतली. पण तरीही डीजेवरचं गाणं अजूनही सुरूच होतं. गोलंदाज साकीब महमूददेखील रनअपसाठी तयार झाला होता. डीजेवरील गाणं सुरू असताना पाहून रोहित शर्मा वैतागला, कारण रोहितला ब्रेकनंतर पुन्हा आपल्या डावावर लक्ष केंद्रित करायचे होते. त्यामुळे रोहितने डीजेच्या दिशेने हातवारे केले आणि ‘बंद कर रे’ असं म्हणत रोहित शर्मा स्टाईलमध्ये एक शिवीदेखील घातली.

अलीकडे फॉर्मशी झगडत असलेल्या रोहित शर्माला अखेर या सामन्यात सूर गवसला. त्याने ९० चेंडूत १२ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने ११९ धावा केल्या. त्याच्या खेळीमुळे भारताने केवळ चार विकेट्सने सामना जिंकला नाही तर यजमानांनी तीन सामन्यांची मालिका आपल्या नावे केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०२३ च्या विश्वचषकानंतर रोहितचे हे पहिले वनडे शतक आहे. या शतकासह, त्याने महान ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पाँटिंगच्या ३० शतकांच्या संख्येला मागे टाकले आणि विराट कोहली आणि सचिन तेंडुलकरच्या मागे तो सर्वाधिक वनडे शतकं करणारा तिसरा खेळाडू आहे. रोहितला त्याच्या या शानदार खेळीसाठी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.