सध्या रोहित शर्मा आणि विराट कोहली या भारताच्या दिग्गज खेळाडूंच्या वनडे क्रिकेटमधील भविष्याबद्दल जोरदार चर्चा सुरू आहे. दोघेही खेळाडू आगामी २०२७ चा वनडे विश्वचषकापूर्वीच वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याची चर्चा सुरू आहे. पण या सर्व चर्चांदरम्यान रोहित शर्माने आयसीसी क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे.
रोहित शर्मा आयसीसी वनडे क्रमवारीत दुसऱ्या स्थानी
वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान यांच्यातील एकदिवसीय मालिका संपल्यानंतर, आयसीसीने एकदिवसीय क्रमवारी जाहीर केली आहे. ज्यामध्ये भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला एका स्थानाचा फायदा झाला आहे. ज्यामुळे तो आता क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर बाबर आझमने पहिलं स्थान गमावलं असून तो तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे.
भारताचा सलामीवीर शुबमन गिल वनडे क्रमवारीत पहिल्या स्थानी काय आहे. तर विराट कोहली चौथ्या स्थानी कायम आहे. भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर ८व्या स्थानी कायम आहे. तर ट्रेव्हिस हेडला एका स्थानाचा फायदा झाला असून तो १२व्या स्थानी आला आहे.
वनडे आयसीसी क्रमवारीत गोलंदाज कितव्या स्थानी?
आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत टॉप-१० गोलंदाजांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. कुलदीप यादव दुसऱ्या क्रमांकावर आहे तर रवींद्र जडेजा ९ व्या क्रमांकावर आहे. वेस्ट इंडिजचा गुडाकेश मोती ५ स्थानांनी पुढे गेला आहे. त्यामुळे तो १२ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. दुसरीकडे, भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी यांना प्रत्येकी एका स्थानाचा फटका बसला आहे. शमी आता १४ व्या क्रमांकावर आहे तर सिराज १५ व्या क्रमांकावर आहे.

तिलक वर्माची आयसीसी टी-२० क्रमवारीत मोठी झेप
आयसीसी टी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत तिलक वर्माला एका स्थानाचा फायदा झाला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत आतापर्यंत खेळल्या गेलेल्या दोन्ही सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज ट्रॅव्हिस हेड अपयशी ठरला. यामुळे हेड चौथ्या स्थानी घसरल्याने तिलक वर्माने तिसरं स्थान गाठलं आहे. तर इंग्लंडचा फिल सॉल्ट चौथ्या स्थानी पोहोचला आहे. तिलकचे रेटिंग गुण ८०४ आहेत तर सॉल्टचे रेटिंग गुण ७९१ आहेत. तर भारताचा अभिषेक शर्मा सर्वाधिक ८२९ रेटिंग गुणासह पहिल्या स्थानी आहे.