Rohit Sharma on POTM & POTS Award: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बहुचर्चित वनडे मालिका आज संपली आहे. ऑस्ट्रेलियाने २-१ च्या फरकाने ही वनडे मालिका आपल्या नावे केली. पण अखेरच्या वनडे सामन्यात टीम इंडियाचे स्टार खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी संघाला ९ विकेट्सने विजय मिळवून दिला. रोहित शर्माने या सामन्यात शतकी खेळी केली आणि सामनावीर ठरला. तर रोहित शर्माला मालिकावीराचा पुरस्कारही मिळाला. यानंतर रोहितने मोठं वक्तव्य केलं. आहे.

रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरूद्ध तिसऱ्या वनडे सामन्यात १२५ चेंडूत १३ चौकार आणि ३ षटकारांसह १२१ धावांची शानदार खेळी केली. तर संपूर्ण वनडे मालिकेत सर्वाधिक २०३ धावा केल्याने त्याला मालिकावीराचा पुरस्कारही देण्यात आला. रोहितने पहिल्या सामन्यात ८ धावा, तर एडलेडमधील दुसऱ्या सामन्यात ७४ धावांची खेळी केली होती.

रोहित शर्माचं भारताच्या विजयानंतर मोठं वक्तव्य

रोहित शर्मा सामनावीर व मालिकावीराचा पुरस्कार मिळाल्यानंतर म्हणाला, “ऑस्ट्रेलियात खेळताना नेहमीच कठीण परिस्थिती खेळण्याची तयारी ठेवावी लागते. दर्जेदार गोलंदाजांचा सामना करावा लागतो. त्यामुळे परिस्थिती समजून घेत सर्वोत्तम प्रयत्न करणं महत्त्वाचं असतं. बराच काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलो नव्हतो, पण चांगली तयारी केली होती. त्यामुळे मालिकेसाठी येण्यापूर्वी थोडा आत्मविश्वास होता. मालिका जिंकता आली नाही, पण अनेक सकारात्मक गोष्टी घडल्या. हा तरुण संघ आहे, त्यांना या मालिकेतून बरेच धडे मिळतील.”

“मी जेव्हा सुरूवातीला संघात आलो होतो, तेव्हा वरिष्ठ खेळाडूंनी आम्हाला खूप मार्गदर्शन केलं होतं. आता ती जबाबदारी आमची आहे. ऑस्ट्रेलियात खेळणं कधीच सोपं नसतं, परदेशात क्रिकेट खेळणं कठीण राहिलं आहे. त्यामुळे आमचा अनुभव तरुण खेळाडूंशी शेअर करून त्यांना स्वतःचा गेम प्लॅन तयार करायला मदत करणं गरजेचं आहे,” असं माजी कर्णधार पुढे म्हणाला.

“आजही मी ऑस्ट्रेलियात खेळताना नेहमी बेसिक्सवर भर देतो. हेच पुढच्या पिढीला सांगायचं आहे. मला ऑस्ट्रेलियात खेळायला नेहमीच आवडतं. सिडनी क्रिकेट ग्राउंडवरील आठवणी खूप खास आहेत. उत्कृष्ट पिच, मैदान आणि प्रेक्षकवर्ग. मला माझं काम मनापासून आवडतं आणि पुढेही तसंच करत राहायचं आहे,” रोहित शर्माने अखेरीस म्हणाला.