भारतीय संघाचा वनडे कर्णधार रोहित शर्माने बंगळुरूतल्या नॅशनल क्रिकेट अकादमीत ब्रॉन्को चाचणी दिली. अलीकडेच बीसीसीआयने सर्व खेळाडूंसाठी यो-यो टेस्टच्या बरोबरीने ब्रॉन्को टेस्ट देणं अनिवार्य केलं होतं. ३८वर्षीय रोहितच्या नेतृत्वात गेल्या वर्षी भारतीय संघाने टी२० जेतेपदावर नाव कोरलं होतं. यानंतर रोहितने टी२० प्रकारातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला होता. वर्षभरानंतर रोहितने कसोटी प्रकारालाही अलविदा केला. कसोटी आणि टी२० प्रकारातून निवृत्ती घेतल्यानंतर वनडे खेळण्यावर लक्ष केंद्रित करणार असल्याचं रोहितने स्पष्ट केलं होतं.
स्पर्धात्मक क्रिकेटपासून दूर गेल्यामुळे रोहित ब्रॉन्को टेस्ट पार करू शकेल का याबाबत साशंकता होती. मात्र रोहितने आपल्या कामगिरीने एनसीए व्यवस्थापनाला प्रभावित केलं. रेव्ह स्पोर्ट्स ग्लोबलने दिलेल्या वृत्तानुसार ३० आणि ३१ ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या चाचणीत ब्रॉन्को टेस्टचा अडथळा पार केल्याचं या वृत्तात म्हटलं आहे. बंगळुरू इथे सेंटर ऑफ एक्सलन्स इथे झालेल्या टेस्टवेळी रोहितचा फिटनेस वाखाणण्याजोगा होता अशी नोंद एनसीए व्यवस्थापनाने केली. वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णाने या टेस्टमध्ये चांगली कामगिरी नोंदवली.
पुढच्या महिन्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिका खेळणार आहे. १९, २३ आणि २५ ऑक्टोबरला हे सामने होणार आहेत. याआधी भारतीय अ संघ ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध ३० सप्टेंबर, ३ आणि ५ ऑक्टोबर रोजी कानपूर इथे खेळणार आहे. रोहित वनडे मालिकेच्या तयारीचा भाग म्हणून अ संघाकडून खेळणार का हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.