Rohit Sharma Virat Kohli comeback delayed: रोहित शर्मा आणि विराट कोहली आयपीएल २०२५ पासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहेत. त्यामुळे टी-२० आणि कसोटी निवृत्तीनंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना पुन्हा मैदानावर खेळताना पाहण्यासाठी उत्सुक आहेत. भारतीय संघ ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली असून रोहित-विराटला पाहण्यासाठी चाहत्यांना अजून वाट पाहावी लागणार आहे.
टी-२० आंतरराष्ट्रीय आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणारे भारतीय संघाचे हे दोन स्टार फलंदाज आता फक्त एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार आहेत. दोघंही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत खेळण्याची अपेक्षा आहे. पण याआधी दोघेही अ संघांच्या एकदिवसीय मालिकेत खेळण्याची चर्चा होती. पण संघ जाहीर केल्यानंतर या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
रोहित शर्मा-विराट कोहलीची ऑस्ट्रेलियाविरूद्ध मालिकेसाठी निवड नाही
वरिष्ठ संघांच्या वनडे मालिकेपूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया अ संघात वनडे मालिका खेळवली जाणार आहे. यासाठी बीसीसीआयने भारत अ संघाची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्याची तयारी करण्यासाठी रोहित शर्मा या मालिकेत सहभागी होऊ शकतो अशी चर्चा होती, त्यामुळे सर्वांच्या नजरा या संघनिवडीवर होत्या. तर या ३ सामन्यांमध्ये विराट कोहलीने देखील खेळावं अशी मागणी होत होती.
आता भारतीय चाहत्यांना विराट आणि रोहितच्या पुनरागमनासाठी थेट ऑस्ट्रेलिया दौऱ्याची वाट पाहावी लागेल. ही मालिका ऑक्टोबरच्या अखेरीस खेळवली जाईल. परंतु केवळ विराट आणि रोहितच नाही तर श्रेयस अय्यरचीही या अ संघाविरूद्ध मालिकेसाठी संघात निवड करण्यात आली नाही. अ संघाविरूद्ध मालिकेसाठी श्रेयस अय्यर संघाचे नेतृत्त्व करेल अशी चर्चा होती. मात्र प्रत्यक्षात चित्र वेगळंच आहे.
आपल्या नेतृत्त्वाने आणि फलंदाजीने सातत्याने प्रभावित करणाऱ्या रजत पाटीदारला मालिकेच्या पहिल्या सामन्यासाठी कर्णधार बनवण्यात आले आहे. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यासाठी कर्णधारपदाची जबाबदारी युवा फलंदाज तिलक वर्मा यांच्याकडे देण्यात आली आहे. आशिया कप २०२५ मध्ये सहभागी झाल्यानंतर तिलक या संघात सहभागी होईल. या मालिकेतील सामने ३० सप्टेंबर, ३ ऑक्टोबर आणि ५ ऑक्टोबर रोजी खेळवले जातील. तिन्ही सामने कानपूरमध्ये होतील.
ऑस्ट्रेलिया अ संघाविरूद्ध वनडे मालिकेसाठी भारत अ संघ
पहिल्या सामन्यासाठी संघ :
रजत पाटीदार (कर्णधार), प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), रियान पराग, आयुष बदोनी, सूर्यांश शेडगे, विपराज निगम, निशांत सिंधू, गुर्जपनीत सिंग, युधवीर सिंग, रवी बिश्नोई, अभिषेक पोरेल (यष्टीरक्षक), प्रियांश आर्य, सिमरनजीत सिंग
दुसऱ्या सामन्यासाठी संघ:
तिलक वर्मा (कर्णधार), रजत पाटीदार (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), रियान पराग, आयुष बडोनी, सूर्यांश शेडगे, विपराज निगम, निशांत सिंधू, गुरजपनीत सिंग, युधवीर सिंग, रवी बिश्नोई, अभिषेक पोरेल, हर्षित राणा, अर्शदीप सिंग</p>