Rohit Sharma Virat Kohli On Playing in Australia: सिडनीमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या फटकेबाजीने धुमाकूळ घातला. रोहित शर्मा आणि विराट कोहली या जोडीने १६८ धावांची भागीदारी रचत भारताला तिसऱ्या वनडेत एकतर्फी विजय मिळवून दिला. रोहितने शतकी खेळी केली तर विराटने अर्धशतक केलं. रोहित-विराटने या मॅचविनिंग खेळीनंतर त्यांच्या निवृत्तीवर मोठं वक्तव्य केलं.
अॅडलेडनंतर, तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातही हिटमॅनने बॅटने उत्कृष्ट कामगिरी केली. रोहितने शानदार फलंदाजी करत १२५ चेंडूत नाबाद १२१ धावा केल्या. दोन वेळा शून्यावर बाद झाल्यानंतर विराटनेही उत्कृष्ट फॉर्ममध्ये येऊन ८१ चेंडूत ७४ धावांची खेळी करत रोहितला चांगली साथ दिली. कोहली आणि रोहितने दुसऱ्या विकेटसाठी १६८ धावांची अखंड भागीदारी केली आणि संघाला विजयाकडे नेलं.
भारताच्या विजयानंतर, रोहित आणि कोहलीने एकत्रितपणे माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री व एडम गिलक्रिस्ट यांच्याशी चर्चा केली. रोहित शर्मा आधी म्हणाला, “मला नेहमीच ऑस्ट्रेलियात येऊन खेळायला आवडतं आणि सिडनीच्या या मैदानावर क्रिकेट खेळण्याचा अनुभव नेहमीच खास राहिला आहे. २००८ मधल्या माझ्या पहिल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या, तो दौरा खरंच कमाल होता. आता आम्ही पुन्हा इथे खेळायला येऊ की नाही माहित नाही, पण प्रत्येक क्षणाचा मी मनापासून आनंद घेतलाय.”
“गेल्या अनेक वर्षांतील सन्मान आणि यशापेक्षा आम्हाला क्रिकेट खेळण्याचा आनंद जास्त महत्त्वाचा वाटतो. मागील १५ वर्षांत काय झालं यापेक्षाही मला इथे खेळायला नेहमीच आवडत आलं आहे आणि मला वाटतं विराटसाठीही हेच खरं आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे खूप खूप आभार,” असं रोहित म्हणाला.
विराट कोहली रोहितबरोबरच्या मॅचविनिंग भागीदारीबाबत काय म्हणाला?
विराट कोहली पुढे म्हणाला, “आपण कितीही वर्षं आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलो तरी हा खेळ नेहमी काहीतरी नवं शिकवतो (पहिल्या दोन सामन्यात शून्यावर बाद होण्याबद्दल बोलताना विराटने सांगितलं). काही दिवसांत मी ३७ वर्षांचा होणार आहे, पण धावांचा पाठलाग करताना माझ्यातील सर्वोत्तम खेळी आपोआप बाहेर येते. रोहितबरोबर मोठी, सामना जिंकवणारी भागीदारी करायला छान वाटलं”.
“सुरुवातीपासूनच आम्ही परिस्थिती समजून खेळण्यावर भर दिला आहे, आणि हेच आमचं बलस्थान आहे. आज आम्ही कदाचित सर्वात अनुभवी जोडी आहोत, पण जेव्हा आम्ही तरुण होतो, तेव्हाही आम्हाला ठाऊक होतं की मोठी भागीदारी करून सामना आपल्या बाजूने वळवता येतो. मला वाटतं हे सगळं २०१३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या घरच्या मालिकेत सुरू झालं. जर आम्ही एकत्र २० षटकं टिकून खेळलो, तर संघाला विजयाच्या जवळ नेऊ शकतो आणि प्रतिस्पर्ध्यांनाही ते जाणवतं.”
“आम्हाला या देशात यायला नेहमीच आवडतं, इथे आम्ही नेहमी छान क्रिकेट खेळलो आहोत. इतक्या मोठ्या संख्येने प्रेक्षकांनी येऊन आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद!”, असं म्हणत विराट-रोहितने ऑस्ट्रेलियाचे आभार मानले. रोहित शर्मा-विराट कोहलीचा हा त्यांच्या कारकिर्दीतील अखेरचा ऑस्ट्रेलिया दौरा असणार आहे. यानंतर वनडे वर्ल्डकप २०२७ पर्यंत पुन्हा संघ ऑस्ट्रेलियात खेळण्यासाठी जाणार नाही.
