BCCI Breaks Silence on Rohit Virat ODI Future: भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेनंतर आता टीम इंडिया ९ सप्टेंबरपर्यंत विश्रांती घेणार आहे. पण यादरम्यान रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या वनडे क्रिकेटमधील निवृत्तीवरून जोरदार चर्चा सुरू आहे. विराट-रोहित २०२७ चा विश्वचषक खेळू शकणार नसल्याची बातमी सध्या जोर धरून आहे. वर्ल्डकप पूर्वीच दोघेही खेळाडू निवृत्ती घेणार असल्याचं देखील म्हटलं जातंय. यावर आता बीसीसीआयने वक्तव्य केल्याचा रिपोर्ट समोर आला आहे.

एका अहवालात असा दावा करण्यात आला आहे की या दोन्ही स्टार खेळाडूंचा प्रवास ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील एकदिवसीय मालिकेनंतर संपणार आहे. परंतु असं दिसतं की सध्या बीसीसीआयसाठी रोहित-विराटचं वनडेमधील भविष्य हा सध्या महत्त्वाचा मुद्दा नसल्याचं म्हटलं आहे.

२०२४ मध्ये टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर विराट आणि रोहितने या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली. तर मे महिन्यात, दोघांनीही अचानक लागोपाठ कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केलं. त्यानंतर रोहित-विराट २०२७ च्या विश्वचषकात खेळणार असल्याचे डोक्यात ठेवून हा निर्णय घेतल्याचं सर्वांनी गृहित धरलं.

रोहित शर्मा विराट कोहलीच्या वनडे निवृत्तीवर बीसीसीआयचं काय म्हणणं आहे?

रविवार, १० ऑगस्ट रोजी एका वृत्तपत्राच्या वृत्तात असा दावा करण्यात आला की विराट आणि रोहित हे वनडे विश्वचषकासाठी संघ व्यवस्थापनाच्या योजनांचा भाग नाहीत आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील वनडे मालिकेसह दोघांचीही कारकीर्द पूर्णपणे संपुष्टात येऊ शकते. पण पीटीआयच्या वृत्तामध्ये मात्र बीसीसीआयने रोहित-विराटबाबत वक्तव्य केल्याचा रिपोर्ट आला आहे.

पीटीआयच्या या अहवालात, बीसीसीआयशी संबंधित सूत्रांचा हवाला देऊन म्हटलं आहे की “बोर्डाचं लक्ष सध्या आशिया कपवर आहे आणि जर विराट-रोहितच्या मनात काही असेल तर ज्याप्रमाणे त्यांनी इंग्लंड दौऱ्यापूर्वी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेताना कल्पना दिली होती, त्याप्रमाणेच ते यावेळीही बीसीसीआयला कळवतील. भारतीय संघाच्या दृष्टीने पुढील मोठी स्पर्धा म्हणजे टी-२० वर्ल्डकप. जो फेब्रुवारी २०२६ मध्ये होणार आहे आणि त्याआधी संघाला सराव सुरू करायचा आहे. सध्या सर्व लक्ष आशिया कपसाठी भारताचा सर्वाेत्कृष्ट टी-२० संघ निवडण्यावर आहे. सर्व खेळाडू फिट आणि उपलब्ध असतील अशी आशा आहे.”

आशिया कप २०२५ ९ सप्टेंबरपासून २८ सप्टेंबरदरम्यान खेळवला जाणार आहे. आगामी टी-२० विश्वचषक २०२६ लक्षात घेता आशिया कप हा टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवला जाणार आहे. रोहित आणि विराट आता थेट भारत वि. ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेत खेळताना दिसणार आहेत, जी मालिका १९ ऑक्टोबरपासून खेळवली जाईल.