Rohit Sharma Stand Unveil at Wankhede with His Parents Video: मुंबईतील आयकॉनिक वानखेडे स्टेडियमवर मुंबईचा राजा रोहित शर्माच्या नावाच्या स्टँन्डचे अनावरण करण्यात आले. रोहित शर्मा हा या कार्यक्रमासाठी आपल्या कुटुंबासह उपस्थित होता. ज्या मैदानावर रोहित शर्माने क्रिकेटचे धडे गिरवले होते, आज त्याच मैदानावर त्याने केलेल्या कामगिरीसाठी त्याची एक मोठी आठवण असणार आहे.
वानखेडे स्टेडियमला गेल्याच वर्षी ५० वर्षे पूर्ण झाली. मुंबईतील सर्वात महत्त्वाचं आणि मुंबईच्या खेळाडूंचं माहेरघर असलेलं वानखेडे स्टेडियम कायमचं खास राहिलं आहे. रोहित शर्मा हा मुळचा मुंबईचा बोरीवलीमधील. रोहितने मुंबईकडून देशांतर्गत क्रिकेट खेळत भारतीय संघात स्थान मिळवले. यानंतर जे घडलं तो एक इतिहास आहे. हिटमॅन म्हणून प्रसिद्धी मिळवत रोहितने भारताचं नेतृत्त्व केलं. त्यामुळे अजूनही क्रिकेट खेळत असताना आपल्या नावाचं स्टँन्ड असणंही रोहितसाठी खूप मोठी गोष्ट आहे.
रोहित शर्माच्या नावाच्या स्टँन्डचं अनावरण होण्यापूर्वी त्याने आपल्या भावना मांडल्या आणि हा क्षण शब्दात व्यक्त करू शकणार नाही, असंही रोहित म्हणाला. यानंतर रोहित शर्माच्या स्टँन्डचे अनावरण करण्याची वेळ आली. यादरम्यान रोहित त्याच्या आई-वडिल आणि पत्नीला स्टेजवरून बोलावताना दिसले. तितक्यात रोहित स्वत: खाली उतरला आणि त्याने हाताला धरत आपल्या आई-वडिलांना स्टेजवर नेलं.
रोहित शर्माने त्याच्या आई-वडिलांना स्वत: स्टेजवर नेलं आणि पत्नी रितिकालाही बोलावलं. स्टेजवर आल्यानंतरही त्याचे आई-वडिल पुढे आले नाहीत, यानंतर रोहितने त्यांना पुढे नेलं. यानंतर रोहित स्वत: मागे राहिला आणि त्याने आपल्या आई-बाबांना अनावरण करण्यास सांगितले. यादरम्यान त्याची पत्नी रितिका सजदेहही स्टेजवर होती. रोहितच आई-वडिल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्टेजवरून बझर प्रेस केल्यानंतर रोहितच्या नावाच्या स्टँन्डवरील पडदा बाजूला झाला आणि त्याच्या नावाचं स्टँन्डचं अनावर करण्यात आलं. रोहित शर्माने आपल्या आई-वडिलांना दिलेला हा मान पाहून त्याचं कौतुक केलं जात आहे.
रोहित शर्माच्या स्टँन्डचे अनावरण होताच त्याची पत्नी रितिका सजदेह भावुक झाली होती. तो क्षण पाहताना तिच्या डोळ्यात आनंदाश्रू भरून आले होते. रोहित शर्माच्या या खास दिनी त्याचे आई-वडिल, पत्नी रितिका सजहेह, त्याचा भाऊ आणि भावाची पत्नी असे सारे जण कुटुंबीय उपस्थित होते. रोहितने त्याच्या नावाच्या स्टँन्डच्या अनावरणापूर्वी केलेल्या भाषणात त्याच्या कुटुंबीयांचे आभार मानले.