Ritika Sajdeh Reaction on Rohit Sharma Test Retirement: भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार राहिलेला रोहित शर्माने अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. ३८ वर्षीय रोहितने इंग्लंड दौऱ्यापूर्वी निवृत्तीचा निर्णय घेतला. रोहितने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत कसोटीतून निवृत्ती घेत असल्याची माहिती दिली. रोहितला इंग्लंड दौऱ्याकरता कर्णधारपदावरून काढणार असल्याचा निर्णय निवड समिती आणि बोर्डाने घेतला होता, यादरम्यान रोहितने निवृत्ती जाहीर केली.

आयपीएल २०२५ नंतर भारतीय संघ ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या कसोटी मालिकेला २० जूनपासून सुरूवात होणार आहे. आज ७ मार्चला रिपोर्टमध्ये माहिती समोर आली होती की, रोहितला कदाचित कसोटी क्रिकेटच्या कर्णधारपदावरून काढणार होते, या रिपोर्टदरम्यान रोहितने निवृत्तीची घोषणा केली. यानंतर आता रोहित शर्मा फक्त वनडे क्रिकेट खेळताना दिसणार आहे.

रोहित शर्माने इन्स्टाग्रामवर कसोटी क्रिकेटची डेब्यू कॅपचा फोटो पोस्ट करत कॅप्शन लिहिलं की, “हॅलो, मला सर्वांना हे सांगायचं आहे की मी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे. कसोटी क्रिकेटमध्ये देशाचं नेतृत्त्व करणं हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. मला इतकं वर्ष खूप प्रेम आणि कायम पाठिंबा दिल्याबद्दल सर्वांचे खूप आभार. मी वनडे क्रिकेटमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करत राहणार आहे.”

रोहित शर्माच्या कसोटीमधून निवृत्तीनंतर त्याची पत्नी रितिका सजदेह हिने देखील प्रतिक्रिया दिली आहे. रोहित शर्माची इन्स्टाग्राम स्टोरी रितिका सजदेहने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला पोस्ट करत इमोजी पोस्ट केले. रितिका तुटलेलं ह्रदय, सॅल्युट करतानाचा इमोजी, डोळे भरून आल्याचा इमोजी आणि शेवटी पुन्हा एकदा तुटलेल्या ह्रदयाचा इमोजी शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या.

Ritika Sajdeh Reaction on Rohit Sharma Test Retire Announcement
रोहित शर्माच्या निवृत्तीवर रितिका सजदेहची प्रतिक्रिया (फोटो-Ritika Sajdeh Instagram)

पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमधील त्याच्या प्रभावी कामगिरीनंतर, त्याला २०१३ मध्ये भारतीय कसोटी संघात पदार्पण करण्याची संधी मिळाली. यानंतर रोहित शर्माने त्याच्या १२ वर्षांच्या कसोटी क्रिकेट कारकिर्दीत त्याने भारतासाठी ६७ कसोटी सामने खेळले आणि ४०.५७ च्या सरासरीने ४३०१ धावा केल्या आणि त्याची सर्वोत्तम खेळी २१२ धावांची होती. याशिवाय, गोलंदाजीत त्याच्या नावावर दोन विकेट्स आहेत. तर त्याच्या नावावर कसोटीत १२ शतकं आहेत.